चलनात असतानाही पन्नास पैशांच्या नाण्यांना ना! 

प्रकाश बनकर
रविवार, 24 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - पन्नास पैशांचे नाणे अद्यापही चलनात आहे; मात्र बाजरपेठेत या नाण्यावर अघोषित बंदी घातल्याने ते स्वीकारण्यास कुणीही तयार नाही. परिणामी, व्यवहारातून हे नाणे गायब झाले आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे ही नाणी आहेत असे नागरिक आणि व्यापारी त्रस्त झाले असल्याचे चित्र आहे.  

औरंगाबाद - पन्नास पैशांचे नाणे अद्यापही चलनात आहे; मात्र बाजरपेठेत या नाण्यावर अघोषित बंदी घातल्याने ते स्वीकारण्यास कुणीही तयार नाही. परिणामी, व्यवहारातून हे नाणे गायब झाले आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे ही नाणी आहेत असे नागरिक आणि व्यापारी त्रस्त झाले असल्याचे चित्र आहे.  

कुठलेही चलन व्यवहारातून बंद करण्यापूर्वी रिझर्व्ह बॅंक सूचना देते. त्या बाबत प्रसिद्धी माध्यमातून नागरिकांना माहिती दिली जाते; पण पन्नास पैशांचे नाणे चलनातून बाद झाले अशी कोणतीही सूचना रिझर्व्ह बॅंकेने अद्याप दिलेली नाही. त्यामुळे हे नाणे चलनात आहे. असे असताना ते बंद झाल्याच्या अफवेमुळे मागील तीन ते चार वर्षांपासून बाजारपेठेत हे नाणे कुणी स्वीकारण्यास तयार नाही. परिणामी, ज्यांनी या नाण्याच्या माध्यमातून बचत म्हणून घरी पैसे जमा केले आहेत त्यांच्याकडे ही रक्कम पडून आहे. विशेष म्हणजे रिझर्व्ह बॅंकेकडून कुठलीही सूचना नसताना बॅंकाही हे नाणे स्वीकारण्यास तयार नाहीत.

बॅंकांनी बदलून द्यावे 
पन्नास पैशांचे नाणे बंद झालेले नाही. त्यामुळे बॅंकांनी ही नाणी स्वीकारून त्या रकमेच्या नोटा द्याव्यात किंवा त्याच किमतीची एक रुपयांची नाणी द्यावीत, अशी मागणी होत आहे.

मी किराणा दुकानदार आहे. माझ्याकडे पन्नास पैशांची १९० रुपयांचे नाणी जमा झाली आहेत. ग्राहक हे नाणे स्वीकारत नाहीत. माझ्यासारख्या अनेक व्यापाऱ्यांकडे ही नाणी पडून आहेत. ती जमा करण्यासाठी बॅंकेत गेलो; मात्र बॅंकेने नाणे स्वीकारत नसल्याचे सांगितले. तसे लिहूनही दिले. आता दाद मागावी तरी कुणाकडे.
- गोकुळदास पटेकर, व्यापारी

ग्राहकांचे नुकसान 
अनेकदा बिल ५० पैशांच्या स्वरूपात येते. (उदाहरणार्थ ८०.५० पैसे किंवा ७५.५०) पेट्रोल, डिझेलच्या किमती तर अशाच आहेत. त्यामुळे ग्राहकांना ५० पैशांऐवजी एक रुपया द्यावा लागत असून, त्यांचे नुकसान होत आहे. या शिवाय ठराविक वस्तू घेतल्यानंतर सुट्या पैशांअभावी ग्राहकांना नाईलाजाने चॉकलेट दिले जाते. पन्नास पैशांचे नाणे चलनातून बाद केलेले नाही. ते सुरू आहे; मात्र त्यांची संख्या कमी आहे. या विषयी बॅंकांनीही ग्राहकांची दिशाभूल करू नये, असे आवाहन बॅंक तज्ज्ञांतर्फे करण्यात येत आहे. 

Web Title: aurangabad news coin