काँग्रेस आमदार सत्तार यांच्याकडून शेतकऱ्याला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

सत्तारांच्या अडचणी वाढल्या
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने 52 संस्थांचे साडेआठ कोटी रुपयांचे कर्जमाफ केल्याप्रकरणी पोलीसांनी संचालक म्हणून आमदार अब्दुल सत्तार यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. त्यातच शेतकऱ्याला मारहाण केल्याचे प्रकरण समोर आल्यामुले सत्तार यांच्या अडचणीत आणखीणच वाढ झाली आहे.

औरंगाबाद : सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी शेतात जाऊन मुख्तार शेख सत्तार या शेतकऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मंगळवारी मारहाण केली. आज सोशल मिडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आमदार सत्तार हे आपली जमीन बळकावू पाहत आहेत असा आरोप करत मुख्तार या शेतकऱ्याने सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सिल्लोड तालुक्‍यातील दहिगांव शिवारातील गट नं. 36 व 38 मधील शेतात हा प्रकार घडला. मुख्तार शेख सत्तार आपल्या नातेवाईकांसह शेतात पेरणीचे काम करत असतांना आमदार सत्तार आपल्या 25-30 कार्यकर्ते व पोलीस कर्मचाऱ्यांसह तिथे आले आणि त्यांनी पाच मिनिटाच्या आत शेतातून बाहेर निघा असा दम मुख्तार व इतरांना भरल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

आमदार सत्तार, त्यांचे पुत्र व सिल्लाडचे नगराध्यक्ष समीर सत्तार, शेख वसीम शेख अझीम (पीए) शेख यासेर शेख नईम व त्यांच्या सोबत आलेल्या गुंडानी बेदम मारहाण करत शेतातून हुसकावून लावल्याचे शेख खलील शेख, शेख मुख्तार शेख सत्तार, शेख अब्दुल रहीम शेक करीम यांनी आपल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.

काय आहे प्रकरण ?
दहिगांव शिवारातील "महार हाडोळा' जमीनीची वीस वर्षापुर्वी साळवे नावाच्या व्यक्तीकडून सत्तार बागवान यांनी खरेदी केली होती. परंतु हाडोळा जमिनीची कायद्याने विक्री करता येत नाही हे कळाल्यावर सत्तार बागवान यांनी ही जमीन कल्याणकर व कॉंग्रेस नगरसेवक विठ्ठल सपकाळ यांना विकल्याचे कळते. कल्याणकर व विठ्ठल सपकाळ हे आमदार अब्दुल सत्तार यांचे विश्‍वासू व समर्थक असल्याचे बोलले जाते. दरम्यान, आमदार सत्तार यांनी आपले राजकीय वजन वापरत हाडोळा जमीन विक्रीतील अडथळे दूर केले. सत्तार बागवान यांच्याकडून सपकाळ व कल्याणकर यांनी जमीन खरेदी केली तेव्हा तोंडी सौदा करण्यात आला होता.

जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार आता केला जाऊ शकतो हे कळाल्यावर मुख्तार शेख सत्तार व त्यांच्या कुटुंबियांना जमीन कसायला सुरुवात केली. पैसे देऊन देखील जमीनीचा ताबा सोडत नाही, पेरणी करतोय हे कळाल्यावर मंगळवारी सकाळीच अब्दुल सत्तार व त्यांचे कार्यकर्ते दहिगांवात गेले आणि त्यांनी मुख्तार शेखसह सर्वांना शिवीगाळ करत हुसकावून लावल्याची माहिती आहे.

Web Title: aurangabad news congress mla sattar beats farmer land dispute