गहाळ पिस्टल, काडतुसे सापडेनात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जानेवारी 2018

काडतुसे व पिस्टल सापडली नाहीत; परंतु आमच्या हाती काही फोटो लागले आहेत. त्यात अपघातग्रस्त पोलिस कर्मचाऱ्याचे मित्र बंदुकीसोबत छायाचित्र काढीत असल्याचे दिसत आहे. त्या पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन केले असून चौकशीचे आदेशही दिले आहेत. 
- यशस्वी यादव, पोलिस आयुक्त.

औरंगाबाद - साहित्य घेऊन जाताना रिक्षाला झालेल्या अपघातानंतर गहाळ झालेले पिस्टल व काडतुसांचा शोध घेतला जात असून अद्यापही ते सापडलेले नाहीत. दुसरीकडे पिस्टल हरवल्याचे प्रकरण जबाबदार पोलिस कर्मचारी अमीत शिवानंद स्वामी यांना भोवले. त्यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी दिली. दरम्यान, त्यांच्या बडतर्फीची शक्यता आहे.

अमित स्वामी (वय २७, रा. भोईवाडा, मूळ सोलापूर) मुख्यालयात नोकरीला असून, न्यायालयात सुरक्षारक्षक म्हणून त्यांची नेमणूक आहे. त्यासाठीच त्यांना पोलिस विभागाने पिस्टल व काडतुसे दिली होती. हे साहित्य रिक्षातून घेऊन जाताना अपघात घडला होता. त्यावेळी चंद्रकांत साळवे सोबत होता. आकाशवाणी येथे रिक्षा उलटल्यानंतर स्वामी यांच्या तोंडाला जबर जखम लागून ते रक्तबंबाळ झाले होते. या दरम्यान त्यांची पिस्टल व काडतुसे लंपास झाली. हे प्रकरण त्यांच्या चांगलेच अंगलट आले. याबाबत पोलिस विभागाने बैठक घेतली असून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू झाली आहे. शनिवारी अमित स्वामी यांनी मद्यसेवन केलेले होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळेच त्यांच्याविरुद्ध पोलिस विभागाने कठोर पावले उचलली असून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. 

रिक्षाचालकावर गुन्हा
अभिषेक रुद्राक्ष याने विनापरवाना दारू पिऊन हलगर्जीपणाने रिक्षा चालवली, अशी बाब समोर आली. त्यामुळे त्याच्याविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. त्याला ताब्यात घेऊन चौकशीही करण्यात आली; पण सर्व्हिस पिस्टलचा शोध लागला नव्हता. आकाशवाणी परिसरातील सीसीटीव्ही पोलिसांकडून तपासण्यात येत आहेत.

Web Title: aurangabad news crime