बीड बायपास परिसरात कुत्र्यांची दहशत; मोकाट कुत्र्याने तोडले चार जणांचे लचके

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 13 January 2021

नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून, महापालिकेच्या श्वान पथकाने एका मोकाट कुत्र्याला पकडले.

औरंगाबाद: शहरात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद सुरूच आहे. बुधवारी (ता. १३) बीड बायपास परिसरातील साईनाथ नगरात मोकाट कुत्र्यांनी चार जणांचे लचके तोडले. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून, महापालिकेच्या श्वान पथकाने एका मोकाट कुत्र्याला पकडले.

मोकाट कुत्र्याने चार दिवसांपूर्वी कुंभारवाडा परिसरात तिघांना चावा घेतला होता. हा प्रकार ताजा असतानाच आयप्पा मंदिराच्या पाठीमागे असलेल्या साईनाथ नगरमध्ये बुधवारी सकाळी ९ ते ११ च्या सुमारास तीन मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला. रस्त्यावरून जाणाऱ्या चार जणांचे लचके तोडले. त्यात दोन लहान मुलांचा समावेश आहे.

मकरसंक्रांतीनिमित्त महिलांची आठवडी बाजारात खरेदीसाठी गर्दी

या प्रकाराने नागरिक भयभीत झाले. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाचे प्रमुख डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी तातडीने श्वान पथकाला घटनास्थळी पाठवले. श्वान पथकातील कामगारांनी धावपळ करत एका कुत्र्याला पकडले. मात्र दोन कुत्रे या पथकाला सापडले नाहीत. त्यामुळे गुरुवारी (ता. १४) सकाळी पथक या भागात जाऊन कुत्रे पकडणार आहे.

(edited by- pramod sarawale)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad news Dog terror in Beed bypass area bited 4 persons