डोमेस्टिक एअर कार्गो सेवेने घेतला वेग

डोमेस्टिक एअर कार्गो सेवेने घेतला वेग

औरंगाबाद - उद्योग, शेतीमालाच्या आयात-निर्यातीसाठी चिकलठाणा विमानतळ सज्ज झाले असून, येथून एअर इंडिया आणि जेट एअरवेजच्या माध्यमातून महिन्याकाठी शंभर टनांहून अधिक एअर कार्गोची नियमित वाहतूक देशांतर्गत सुरू आहे. जून २०१६ पासून सुरू झालेल्या या डोमेस्टिक एअर कार्गो सेवेने वेग घेतला आहेत. 

विमानतळ प्राधिकरणातर्फे आंतरराष्ट्रीय एअर कार्गोच्या गतिमान हालचाली सुरू असून नव्या वर्षात चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या सेवेचा विस्तार होणार आहे. येथून एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रुजेटचे उड्डाण होते. डोमेस्टिक एअर कार्गोची सेवा सुरू झाल्यानंतर विमानतळावरून मालाची आवक-जावक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. २०१६ पासून चिकलठाणा विमानतळाच्या जुन्या इमारतीमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे. नियमित येणाऱ्या विमानाने तीन टनांहून अधिक मालाची हवाई वाहतूक होत असल्याचे एअर इंडियातर्फे सांगण्यात आले. ही सेवा छोटे-उद्योजक आणि व्यापाऱ्यासांठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. 

डोमेस्टिक एअर कार्गोच्या सेवेसाठी २०१५ पासून प्रयत्न सुरू होते. मार्च २०१५ ला चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला कस्टमचा दर्जा मिळाला होता. ही सेवा सुरू झाल्यानंतर तीन ते चार टन कार्गोची वाहतूक होती ती आता सहा टनांवर गेली आहे. ही वाढ एअर कार्गो सेवेला चालना देणारी ठरत आहे. 

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून आंतरराष्ट्रीय सेवा 
चिकलठाणा विमानतळावरून डोमेस्टिक एअर कार्गोच्या सेवेला प्रतिसाद मिळत आहे. त्याचप्रमाणे येथून औद्योगिक, फार्म, फूड कार्गो याचीही परदेशात आयात-निर्यात केली जाते. यासाठी पुणे-मुंबईच्या विमानतळावरून आंरराष्ट्रीय एअर कार्गोच्या माध्यमातून हा माल पाठविण्यात येतो. ही आयात-निर्यात औरंगाबादेतूनच व्हावी, यासाठी विमानतळ प्राधिकरणाने पहिल्यापासून हालचाली सुरू केल्या असून, हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय एअर कार्गोची वाहतूक होणार असल्याची माहिती प्राधिकरणातर्फे देण्यात येत आहे.

चिकलठाणा विमानतळावरून आंतरराष्ट्रीय एअर कार्गो सेवा सुरू करण्यासाठीचे ८० टक्‍के काम पूर्ण झाले आहे. यामुळे डिसेंबरच्या शेवटी ही सेवा प्रत्यक्षात सुरू करण्याच्या तयारीने आम्ही सध्या काम करीत आहोत. डोमेस्टिक एअर कार्गो ही सेवाही चांगल्या पद्धतीने सुरू आहे. दोन्ही सेवा सुरू करण्यासाठी आम्ही मोठे प्रयत्न केले होते. आता आंतरराष्ट्रीय सेवा हे लक्ष ठेवून हे काम करण्यात येत आहे. 
- डी. जी. साळवे,  विमानतळ निदेशक, चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ

धावपट्टी सत्तावीसशे फुटांनी वाढणार
विस्तारीकरणात धावपट्टी २७०० फुटांनी वाढविण्यात येणार आहे. यानंतर बोईंग ७७७- ३००, एअरबस ए- ३३० विमान उतरण्याची सुविधा उपलब्ध होईल. या विमानांची प्रवासी वाहतूक क्षमता जास्त असते. तसेच हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमान असतात. त्यामुळे विदेशी पर्यटक आणि उद्योजक औरंगाबादकडे आकर्षित होण्यास मदत होईल. एकूणच या भागातील विविध क्षेत्रांच्या विकासाच्या दृष्टीने नवीन प्रकल्प येण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com