औरंगाबादेत साकारतेय मराठवाड्यातील पहिले उद्योग संग्रहालय 

आदित्य वाघमारे
रविवार, 21 जानेवारी 2018

औरंगाबाद - येथील उद्योग जगताची ताकद असलेल्या लहान आणि मध्यम उद्योगांनी तयार केलेली उत्पादने एकाच छताखाली आता पाहायला मिळणार आहे. मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज ऍण्ड ऍग्रिकल्चर (मासिआ) तर्फे वाळूज कार्यालयात येथील उद्योगजगताची  बलस्थाने संग्रहालय स्वरूपात दिसणार आहेत. मराठवाड्यातील अशाप्रकारचे हे पहिलेच संग्रहालय ठरेल. 

औरंगाबाद - येथील उद्योग जगताची ताकद असलेल्या लहान आणि मध्यम उद्योगांनी तयार केलेली उत्पादने एकाच छताखाली आता पाहायला मिळणार आहे. मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज ऍण्ड ऍग्रिकल्चर (मासिआ) तर्फे वाळूज कार्यालयात येथील उद्योगजगताची  बलस्थाने संग्रहालय स्वरूपात दिसणार आहेत. मराठवाड्यातील अशाप्रकारचे हे पहिलेच संग्रहालय ठरेल. 

औद्योगिक जगतात आपले स्थान बळकट केलेल्या औरंगाबादच्या उद्योगांमध्ये लघू आणि मध्यम प्रकल्पांचा मोठा वाटा आहे. हा वाटा जगाला दिसावा; तसेच गुंतवणूकदार उत्पादनाचा शोध घेत असेल तर, त्याला येथील उद्योगांची बलस्थाने एकाच छताखाली दिसावीत यासाठी मासिआतर्फे आपल्या वाळूज कार्यालयात यासाठी एक संग्रहालयाची उभारणी केली जात आहे. आगामी तीन ते चार महिन्यात हे काम पूर्ण होईल. 1500 चौरस फुटांत हे संग्रहालय उभारले जाणार असून, त्यासाठी 25 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. सहा महिन्यांपासून याचे प्लॅनिंग सुरू होते आणि आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे. विविध कंपन्यांची उत्पादने आज जगात औरंगाबादेतून तयार करून निर्यात केली जातात. ही उत्पादने कोणाची, ती कोण तयार करते, त्याची निर्यात कुठे होते याची माहिती देणारी माहितीपत्रके या उत्पादनांसोबत लावली जाणार असल्याने नवख्या माणसालाही या उत्पादनांची पूर्ण माहिती मिळू शकणार आहे. ज्या उत्पादनांचा आकार मोठा आहे, अशा वस्तू छायाचित्र स्वरूपात पाहायला मिळतील. गुंतवणूकदारांना आणि या वस्तूचा अभ्यास करण्यासाठी हे उद्योग संग्रहालय महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. 

दुर्मीळ पुस्तकांचे ग्रंथालय 
मासिआ कार्यालयाच्या या संग्रहालयाचा एक भाग दुर्मीळ पुस्तकांच्या ग्रंथालयासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. हे एक औद्योगिक पुस्तकांवरील आधारित ग्रंथालय असेल ज्यात फोर्जिंग, मशिनिंग आणि अन्य क्षेत्रातील दुर्मीळ पुस्तके वाचायला आणि पाहायला मिळतील. हे ग्रंथालय उद्योग जगतातील लोकांना आणि विद्यार्थ्यांना सुद्धा फायद्याचे ठरेल. 

औरंगाबादेतील उद्योगांचा राबता जगभरात आहे. हे दिसण्यासाठी एका ठिकाणी सगळी ताकद दिसणे आवश्‍यक आहे. त्यासाठी मासिआने संग्रहालय उभारणीचा निर्णय घेतला आहे. येथे हजारो उत्पादने त्यांच्या माहितीसह उपलब्ध राहणार आहेत. 
-सुनील कीर्दक (अध्यक्ष, मासिआ) 

Web Title: aurangabad news First Industry Museum marathwada