कचऱ्याला आग लावाल  तर खबरदार... 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

औरंगाबाद - शहरात साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला सर्रासपणे आगी लावल्या जात असून, त्यातून निघणाऱ्या धुरामुळे प्रदूषणात वाढ होऊन नागरिकांचा श्‍वास गुदमरत आहे. त्यात महापालिकेला उशिरा शहाणपण सुचले असून, आगी लावणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाईबरोबरच गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.

शहरातील कचऱ्याची कोंडी तीन आठवड्यानंतरही फुटू शकलेली नाही. त्यामुळे काही तुरळक वॉर्ड वगळता सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले असून, त्यातून निघणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त आहेत. गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याच्या ढिगामधून प्रचंड दुर्गंधी सुटलेली असताना महापालिका प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिक स्वतः होऊन कचरा पेटवून देत असल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. सोमवारी (ता. १२) शहरात दोन ठिकाणी कचऱ्याला आगी लागल्याचे दोन फोन अग्निशमन विभागाला आले. 

या दोन्ही ठिकाणी धाव घेऊन अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्‍यात आणली. असे असले तरी इतर ठिकाणी मात्र कचऱ्याला लागलेल्या आगी धुमसत आहेत. त्यातून निघणाऱ्या धुरामुळे प्रदूषण धोकादायकरीत्या वाढत असून, नागरिकांचा श्‍वास गुदमरत आहे. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. दरम्यान, सोमवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी कचऱ्याच्या आगीची दखल घेत कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. सायंकाळी प्रशासनाने कचऱ्याला आगी लावणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला. 

जागा करणार बंदिस्त 
ज्या ठिकाणी कचरा साचला आहे, त्या जागा पत्र्यांचे शेड मारून बंदिस्त करण्यात येणार आहेत. सध्या अस्ताव्यस्त पडलेला कचरा मजुरांच्या माध्यमातून एकत्र करण्याचे काम सुरू असल्याचे महापौरांनी सांगितले.

Web Title: aurangabad news garbage fire sakal news impact