ढिगावर ढीग कचऱ्याचे !

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

औरंगाबाद - कचराकोंडीला ६७ दिवस पूर्ण झाले असले, तरी नागरिकांचा त्रास कायम आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात अद्याप तब्बल साडेपाच हजार टन कचऱ्याचे ढीग पडून असल्याचे प्रशासनातर्फे सोमवारी (ता. २३) सांगण्यात आले. आगामी सहा दिवसांत या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पदाधिकाऱ्यांसह प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. 

कचराकोंडीला दोन महिने पूर्ण झाल्यानंतरही महापालिका, राज्य शासनाचे पहिले पाढे पंचावन्न अशीच स्थिती असून, कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी जागांचा शोध सुरू आहे. गेल्या आठवड्यात नागरिकांनी महापालिका मुख्यालयावर ‘गार्बेज वॉक’ काढून पदाधिकाऱ्यांसह प्रशासनाला घाम फोडला होता. या वेळी नागरिकांना येत्या दहा दिवसांत म्हणजेच ३० एप्रिलपर्यंत शहरातील रस्ते कचरामुक्त करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील कचराप्रश्‍नाची दखल घेत जाब विचारला. त्यामुळे चार दिवसांपासून युद्धपातळीवर कामे सुरू करण्यात आली आहेत. असे असले तरी रस्त्यांवरील कचऱ्याचे ढीग कमी झालेले नाहीत. सध्या केमिकलची प्रक्रिया केलेला सुमारे साडेचार हजार टन, तर ओला व सुका मिक्‍स असलेला एक हजार टन कचरा पडून असल्याचे विशेष अधिकारी विक्रम मांडुरके यांनी सोमवारी सांगितले. सिल्लेखाना, ज्युबिलीपार्क, सेंट्रल नाका, मध्यवर्ती बसस्थानक या भागात जास्त जास्त कचरा असून, आज १८ टन सुका कचरा एका कंपनीला देण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. 

आता उरले सहा दिवसच
कचरा प्रश्‍न मिटत नसल्याने महापौर घोडेले यांनी चांगलाच धसका घेतला आहे. श्री. ठाकरे यांना दहा दिवसांत कचऱ्याचा प्रश्‍न सोडविण्याचा शब्द देण्यात आल्यामुळे एक-एक दिवस ते मोजत आहेत. चार दिवस पाहता-पाहता संपले. आता फक्त सहा दिवस उरले आहेत. त्यात साडेपाच हजार टन कचऱ्याची विल्हेवाट लावावी लागणार आहे.

Web Title: aurangabad news garbage issue