संतप्त नागरिक उतरले रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

औरंगाबाद - शहरातील कचऱ्याचा तिढा महिनाभरानंतरही कायम असून, सेंट्रल नाका येथे महापालिकेच्या जागेवर इतर वॉर्डातील कचरा आणण्यास विरोध करीत सोमवारी (ता. १९) रात्रीपासून नागरिकांनी आंदोलन सुरू केले. मंगळवारी (ता. २०) सकाळी महापौर नंदकुमार घोडेले, प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी नागरिकांची भेट घेऊन यापुढे इतर प्रभागाचा कचरा आणला जाणार नाही, अशी ग्वाही दिल्यानंतर नागरिकांनी माघार घेतली. दरम्यान, महापालिकेने कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जागेची मागणी करताच परिसरातील शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले. रात्री उशिरापर्यंत कचऱ्याच्या विरोधातील आंदोलन सुरूच होते. 

कचऱ्याच्या कोंडीला एक महिना उलटला असला, तरी अद्याप तिढा संपलेला नाही. जुन्या शहरात अद्याप कचऱ्याचे ढीग जागोजागी पडून आहेत. त्यातून निघणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोकाही टळलेला नाही. दरम्यान, सेंट्रल नाका परिसरात प्रशासनाने शेकडो टन कचरा साठवून ठेवला असून, कचऱ्याने भरलेली तीस ते चाळीस वाहने गेल्या काही दिवसांपासून उभी आहेत. या कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसताना इतर प्रभागातील कचरा येथे टाकला जात आहे. त्यामुळे रात्री बारा वाजेच्या सुमारास या ठिकाणी नागरिकांचा मोठा जमाव जमला. त्यांनी इतर ठिकाणचा कचरा या ठिकाणी आणू दिला जाणार नाही, अशी भूमिका घेत रस्त्यावर ठाण मांडले. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांनीदेखील माघार घेतली. त्यानंतर सोमवारी सकाळी पुन्हा एमआयएमचे महापालिकेतील गटनेते नासेर सिद्दिकी, नगरसेवक अजीम यांच्यासह तरुणांनी सेंट्रल नाक्‍यावर धाव घेतली. दरम्यान, माहिती मिळताच प्रभारी आयुक्त नवल किशोर राम, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, उपसचिव सुधार बोबडे, रिता मेत्रेवार, यांनी या ठिकाणी भेट दिली. श्री. राम यांनी वॉर्ड अधिकारी जोशी यांना इतर प्रभागाचा कचरा तातडीने उचलण्याच्या सूचना केल्या. प्रभाग एकमधील कचरा कत्तलखान्याशेजारी असलेल्या जागेवर, तर प्रभाग चारमधील कचरा त्याच प्रभागात नेण्यात आला. 

दोन आठवड्यांत होणार खत 
सेंट्रल नाका येथे साचलेल्या कचऱ्यावर केमिकलची फवारणी करण्याच्या सूचना श्री. राम यांनी नाशिक येथील एक कंपनीला दिल्या. दोन आठवड्यांत येथील कचऱ्याचे खत तयार होईल व दुर्गंधीचा त्रास होणार नाही, असे आश्‍वासन नागरिकांना देण्यात आले. 

रस्त्यावरील कचरा उचला 
प्रभाग तीनमध्ये कचऱ्याची भयंकर स्थिती असून, या भागात रस्त्यावर पडून असलेला कचरा तातडीने उचलण्यात यावा, अशा सूचना प्रभारी आयुक्तांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. 

निकृष्ट पावडरचा वापर 
कचऱ्याची दुर्गंधी येऊ नये यासाठी महापालिकेने मागविलेली पावडर निकृष्ट असल्याची तक्रार या वेळी नगरसेवकांनी केली. त्यावर अन्य कंपन्यांची पावडर खरेदी करण्याच्या सूचना प्रभारी आयुक्तांनी केल्या.

Web Title: aurangabad news garbage issue citizen