निधीऐवजी पाठपुरावा करण्याचा सल्ला! - गिरीश महाजन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात (घाटी) उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. वाढती रुग्णसंख्या, अपुऱ्या मनुष्यबळावरही घाटीचा विदर्भ, खानदेश, मराठवाड्याला मोठा आधार आहे. घाटीने मागण्यांचा पाठपुरावा करत राहावे, पुढच्या वर्षी नक्की विचार करू, असा सल्ला वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिला. 

औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात (घाटी) उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. वाढती रुग्णसंख्या, अपुऱ्या मनुष्यबळावरही घाटीचा विदर्भ, खानदेश, मराठवाड्याला मोठा आधार आहे. घाटीने मागण्यांचा पाठपुरावा करत राहावे, पुढच्या वर्षी नक्की विचार करू, असा सल्ला वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिला. 

वैद्यकीय शिक्षण विभागाचे बजेट अडीचशे कोटींहून बाराशे कोटी झाले तरी घाटीला या बजेटमध्ये प्रतीक्षाच करावी लागणार असल्याचे संकेत घाटीत पार पडलेल्या आढावा बैठकीत मिळाले. वैद्यकीय शिक्षणातील समस्या सोडवण्यासाठी आम्ही पारदर्शक काम करत आहोत. कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यामुळे घाटीला फर्निचरसाठी निधी मिळवल्याचा कित्ता गिरवत घाटीच्या मागण्यांना केराची टोपली गिरीश महाजन यांनी दाखवली. कर्करोगाची चार सेवा केंद्रे सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत भाभाट्रॉन महिनाभरात कार्यान्वित करणार असल्याचे सांगितले. पदनिर्मितीची मान्यता, संरक्षक भित व सेंट्रल ऑक्‍सिजन सिस्टीमसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही दिली.  

वैद्यकीय शिक्षणातील भ्रष्टाचार संपवला
वैद्यकीय महाविद्यालये पूर्वीच्या सरकारमधील मंत्र्यांचीच असल्याने कोणीही प्रवेश प्रक्रिया, डोनेशन याविषयी ‘ब्र’ही काढला नाही. भाजपा सरकारने गेल्या तीन वर्षात अभिमत विद्यापीठांवर अंकुश कसून गुणवत्तेवर आधारित शिक्षण गोरगरिबांच्या आवाक्‍यात आणले व वैद्यकीय पदव्युत्तर पदवीच्या जागा वाढवल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला. 

संशोधन होईना 
रुग्णांची गर्दी, विविध उपक्रमांचा ताण यात संशोधनाला बगल मिळते आहे. या व्यापातही संशोधन मागे पडू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचा मानस मंत्री श्री. महाजन यांनी व्यक्त केला. तर सार्वजनिक आरोग्य विभागाचा भार वैद्यकीय शिक्षण विभाग उचलत असल्याने ही परिस्थिती उद्‌भवली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

यंत्र जपून वापरा
कार्यकर्त्यांची जंत्री वैद्यकीय महाविद्यालयात असते. डोक्‍याला डोके लागल्यावरही सीटी स्कॅन करून घेण्याचा सल्ला ते देत असतात. डॉक्‍टरांनी आवश्‍यक असेल तरच चाचण्या करण्याचा सल्ला द्यावा. जळगावचे सीटी स्कॅन आठ वर्षे बंद होते. आता ते सुरू करता आले. त्यामुळे महागडी यंत्रे जपून वापरण्याचा सल्ला देत कालबाह्य यंत्रांसाठी पुढच्या वर्षात प्रयत्न करणार असल्याचे श्री. महाजन यांनी स्पष्ट केले.

Web Title: aurangabad news girish majan talking