बाजारपेठ सॉफ्टवेअर जुळवाजुळवीत व्यग्र

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

औरंगाबाद -  वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) शनिवारी (ता. एक) देशभर लागू झाला. या नवीन करप्रणालीच्या अंमलबजावणीसाठी बाजारात मोठी लगबग दिसून आली. करप्रणालीनुसार बिलिंग व इतर सुविधा देण्यासाठी शहरातील बाजारपेठ आणि व्यापाऱ्यांनी सॉफ्टवेअर अपग्रेडेशनचे काम हाती घेतले होते. यामुळे बाजारपेठेतील व्यवहार काही प्रमाणात ठप्प होते. व्यवहार सुरू होते तेथे मॅन्युअली पावत्या देण्यात आल्या.

औरंगाबाद -  वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) शनिवारी (ता. एक) देशभर लागू झाला. या नवीन करप्रणालीच्या अंमलबजावणीसाठी बाजारात मोठी लगबग दिसून आली. करप्रणालीनुसार बिलिंग व इतर सुविधा देण्यासाठी शहरातील बाजारपेठ आणि व्यापाऱ्यांनी सॉफ्टवेअर अपग्रेडेशनचे काम हाती घेतले होते. यामुळे बाजारपेठेतील व्यवहार काही प्रमाणात ठप्प होते. व्यवहार सुरू होते तेथे मॅन्युअली पावत्या देण्यात आल्या.

दर रविवारी बंद असणारी सोन्या-चांदीची दुकाने शनिवारीच बंद होती. तर मॉलमध्येही सॉफ्टवेअर अपग्रेडेशनचे काम सुरू होते. यामुळे खरेदी-विक्रीनंतर हाताने पावत्या लिहून देण्याची जुनी पद्धत बाजारात अवलंबण्यात येत असल्याचे दिसले. काही बॅंकांतही अपग्रेडेशनचा काही प्रमाणात परिणाम दिसून आला. ऑटोमोबाईल बाजारपेठ, किरणा यासह जुन्या मोंढ्यातील व्यापारी जीएसटीच्या अंमलबजावणीत गुंतले होते.

तोळ्यामागे सहाशेची वाढ
सराफा बाजारातील दुकाने सॉफ्टवेअर अपग्रेडेशनसाठी शनिवारी बंद होती. सोन्या-चांदीवर पूर्वी एक रुपया वीस पैसे कर लागायचा आता तो तीन रुपये झाला आहे. त्यामुळे एक तोळा सोन्यासाठी किमान सहाशे रुपये अधिकचे मोजावे लागणार आहेत. ही झळ ग्राहकांना सहन करावी लागेल. मोडीवरही तीन टक्‍के कर लागणार आहे. पहिला दिवस असल्यामुळे ही महागाई जाणवली नाही, अशी माहिती सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी दिली.

वाहन बाजारातही लगबग
वाहन बाजारात दुचाकीच्या किमतीत जवळपास तीन टक्‍के वाढ होण्याची शक्‍यता आहे. काही गाड्यांच्या किमती कमीही होणार आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत यासंबंधीचे चित्र स्पष्ट होणे अपेक्षित आहे. जीएसटीच्या पहिल्या दिवशी मार्केटमध्ये सॉफ्टवेअरचेच काम सुरू होते, अशी माहिती दुचाकी व्यावसायिक राहुल पगारिया यांनी दिली.

जुन्या मोंढ्यात नवे बिल
जुन्या मोंढ्यात जीएसटी सॉफ्टवेअरचे काम सुरू आहे. ब्रॅंडेड डाळी व तांदूळ महागणार आहे. जीएसटी अंमलबजावणीच्या कामात व्यापारी गुंतले आहेत. ग्राहकांना जीएसटीनुसार बिलिंग करण्यात आली, असे द जनरल किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष संजय कांकरिया यांनी सांगितले. 

आठवडा लागणार
मोठ्या चारचाकी गाड्यांच्या किमती ५ ते ८ टक्‍क्‍यांनी कमी होणार आहेत. तर लहान गाड्यांच्या एक ते अडीच टक्‍क्‍याने वाढणार आहेत. येत्या आठवडाभरात सर्व काही सुरळीत होईल. हा कर सर्वांसाठी आणि देशासाठी उपयुक्‍त आहे. यामुळे भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होणार आहे, असे उद्योजक सचिन मुळे म्हणाले.

Web Title: aurangabad news GST