बंद आरोग्‍य उपकेंद्रासमोरच प्रसूती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

पीरबावडा - पीरबावडा (ता. फुलंब्री) येथील आरोग्य उपकेंद्र बंद असल्यामुळे उपकेंद्रासमोर महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाल्याचा प्रकार गुरुवारी (ता. २२) सकाळी अकरा वाजता घडला. 

पीरबावडा - पीरबावडा (ता. फुलंब्री) येथील आरोग्य उपकेंद्र बंद असल्यामुळे उपकेंद्रासमोर महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाल्याचा प्रकार गुरुवारी (ता. २२) सकाळी अकरा वाजता घडला. 

पीरबावडा गावातील मंगलबाई वंकर अहिरे (वय ३०) ही महिला सकाळी साडेआठ वाजता प्रसूतीसाठी पतीला सोबत घेऊन आरोग्य उपकेंद्रात आली होती, मात्र आरोग्य उपकेंद्राला कुलूप असल्यामुळे या महिलेला रुग्णालयात जाता आले नाही. यावेळी येथे उपस्थित असलेले अनिस शेख व साहेबराव बोकील यांनी १०८ क्रमांकावर फोन करून याबाबत माहिती दिली. परंतु रुग्णवाहिका येण्याआधीच संबंधित महिलेला वेदना होत असल्याने शेतात जाणाऱ्या अनिता गाडेकर व मीनाबाई गाडेकर यांनी महिलेला उपकेंद्राच्या भिंतीच्या आडोशाला नेऊन महिलेची प्रसूती केली. त्यांना आशा कार्यकर्ती सिंधू ठोंबरे व सुनीता जैस्वाल यांनी मदत केली. प्रसूती झाल्यानंतर एक तासाने आलेल्या रुग्णवाहिकेतून संबंधित महिलेला फुलंब्री येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे महिलेला भरउन्हात रस्त्याच्या कडेला थांबण्याचा प्रसंग ओढवला. 

 ‘सकाळ’ने वेधले होते लक्ष
येथील आरोग्य उपकेंद्र नेहमी बंद राहत असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने १४ सप्टेंबरला प्रसिद्ध केले होते; मात्र याबाबत त्याचवेळी कार्यवाही झाली असती तर संबंधित महिलेवर आज ही वेळ आली नसती.

 यासंदर्भात माहिती मिळताच संबंधित कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात आली आहे. सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास निलंबनाचा प्रस्ताव पाठविण्यात येईल.
- विलास विखे, तालुका आरोग्य अधिकारी

Web Title: aurangabad news health center closed

टॅग्स