जायकवाडीच्या कालव्यांची पाणी वाहण्याची क्षमता निम्याने घटली

राजेभाऊ मोगल
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

निर्मितीपासून आजतागायत दुरुस्तीच झालेली नसल्याने पाणी वाहून नेण्याची क्षमता निम्याने घटली आहे. सध्या डाव्या कालव्यात केवळ 1800; तर उजव्या कालव्यात 900 क्‍यूसेस पाणी मावत आहे. त्यामुळे शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत हव्या तेवढ्या वेगाने पाणी पोहचूच शकत नाही

औरंगाबाद - जायकवाडी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याची धरणाच्या निर्मितीपासून दुरुस्तीच झालेली नाही. त्यामुळे लाभक्षेत्रात  343 किलोमीटर पर्यंत पाणी वाहून नेण्याची क्षमता तब्बल निम्याने कमी झाल्याची स्थिती समोर आली आहे. परिणामी, शेतीस पाणी पोहचविण्यासाठी अनंत अडथळ्याची शर्यत पार करूनही यश येत नसल्याने जलसंपदा विभागासमोर पेच निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी अडीच हजार कोटींचा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे.

आशिया खंडातील मातीचे सर्वात मोठे धरण असलेल्या जायकवाडीचे 18 ऑक्‍टोबर 1965 रोजी तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या हस्ते भूमिपूजन झालेले आहे. माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीने हे धरण साकार झाले. तब्बल 11 वर्षांपर्यंत धरणाचे बांधकाम चालले. या काळातच लाभक्षेत्रातील औरंगाबाद, जालना व परभणी जिल्ह्यात पाणी वाहून नेण्यासाठी 203 किमीचा डावा; तर बीड जिल्ह्यात 140 किमीचा उजवा कालवा बांधण्यात आला. प्रकल्प अहवालानुसार डाव्या कालव्याची पाणी वाहून नेण्याची क्षमता ही 3 हजार सहाशे क्‍यूसेस, तर उजव्या कालव्याची क्षमता 2200 क्‍यूसेस एवढी आहे. मात्र, निर्मितीपासून आजतागायत दुरुस्तीच झालेली नसल्याने पाणी वाहून नेण्याची क्षमता निम्याने घटली आहे.

सध्या डाव्या कालव्यात केवळ 1800; तर उजव्या कालव्यात 900 क्‍यूसेस पाणी मावत आहे. त्यामुळे शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत हव्या तेवढ्या वेगाने पाणी पोहचूच शकत नाही. याबाबत आमच्याकडे वेळेत का पाणी येत नाही, असे मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात प्रश्‍न उपस्थित केले जात आहे. मात्र, देखभाल दुरुस्तीच होत नसल्याचे उत्तर देऊन शेतकऱ्यांचे समाधान केले जात आहे. मात्र, या कालव्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे सिंचनक्षेत्राचे मोठे नुकसान होत आहे. 

रस्त्यांची दुरुस्ती होते, मात्र कालव्याची नाही ? 
रत्यांची देखभाल दुरुस्ती सतत केली जाते. मात्र, कालव्याची दुरुस्ती करण्यासाठी वारंवार मागणी करूनही शासन का दुर्लक्ष करते, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. धरण निर्मितीनंतर खऱ्या अर्थाने या कालव्यांची निगा राखण्याचे कामच झालेले नाही. त्यामुळे जायकवाडीतून लाभक्षेत्रात सिंचनासाठी आवश्‍यक ते पाणी वाहून नेता येत नाही. यामुळे धरण शंभर टक्‍के भरूनही शेतकऱ्यांना रब्बीच्या दोन्ही फेऱ्यात मुबलक पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. 

सिंचनासाठी पाणी देण्यासाठी वितरण प्रणाली सुस्थितीत असणे आवश्‍यक आहे. तरच पाणी पोहचविणे शक्‍य होईल. मात्र, कालव्याची दुरुस्ती नसल्याने हवे तेवढे पाणी सोडण्यास अडचणी आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करावे लागत आहे. 
- बी. एस. स्वामी, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, औरंगाबाद 

Web Title: aurangabad news: jayakwadi dam water