कोपर्डीची निर्भया वर्षभरानंतरही न्यायाच्या प्रतीक्षेत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

औरंगाबाद - ‘‘कोपर्डीच्या निर्भयाचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगून वर्ष उलटत आले, तरीही निर्भयाला न्याय मिळाला नाही. अजूनही ती न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. याच्या निषेधार्थ गुरुवारी (ता. १३) सकाळी दहा वाजता राज्यभर मूक मोर्चे काढण्यात येतील,’’ अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. 

औरंगाबाद - ‘‘कोपर्डीच्या निर्भयाचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगून वर्ष उलटत आले, तरीही निर्भयाला न्याय मिळाला नाही. अजूनही ती न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. याच्या निषेधार्थ गुरुवारी (ता. १३) सकाळी दहा वाजता राज्यभर मूक मोर्चे काढण्यात येतील,’’ अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. 

कोपर्डीतील निर्भया, कर्जमाफी, जनतेतून सरपंच निवड आदी विविध विषयांवर श्री. तटकरे यांनी पक्षाची भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘‘कोपर्डीतील घटनेने संतापलेल्या मराठा समाजाने राज्यात शांततेत भव्य मोर्चे काढले. त्यावेळी हा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवू, असे आश्‍वासन श्री. फडणवीस यांनी दिले होते. प्रत्यक्षात वर्षभरात सरकारने काहीही केल्याचे दिसत नाही. राज्यात महिलांवरील अत्याचारांत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे. अशा स्थितीत सरकार काहीच उपाययोजना करताना दिसत नाही. कर्जमाफी, पेरणीसाठी दहा हजार रुपये देणार, या घोषणेनंतर सरकार गोंधळलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी देशाची कर्जमाफी एका आदेशात केली. मात्र, राज्यात कर्जमाफी करताना सरकारला दोन, तीन आदेश काढावे लागले. तरीही गोंधळाची स्थिती आहे. जनतेतून सरपंच निवडीचा घोळ घालून भाजप ग्रामीण विकासाचा खेळखंडोबा करण्याच्या तयारीत आहे.’’ यावेळी शहराध्यक्ष काशीनाथ कोकाटे, प्रा. किशोर पाटील, रंगनाथ काळे, ख्वाजाभाई, संजय वाघचौरे, कदीर मौलाना, सुरजितसिंग खुंगर, अभिजित देशमुख, प्रा. किशोर पाटील, विजय साळवे, अभिषेक देशमुख, दत्ता भांगे आदी उपस्थित होते.  

जनतेमधून थेट सरपंच निवड म्हणजे ग्रामीण विकासाचा खेळखंडोबा करण्याचे काम सरकार करीत आहे. मुख्य प्रश्‍नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी त्यांना अशी हुक्‍की येत आहे. या निर्णयाचे ग्रामीण विकासावर दूरगामी परिणाम होतील. म्हणून आमचा या निर्णयाला विरोध आहे. 

पक्षाची स्थापना झाल्यानंतर सहा महिन्यांतच आम्ही सत्तेवर आलो. पंधरा वर्षे सत्तेत राहिलो. या काळात संघटनात्मक बांधणी करण्यात आम्ही अपयशी झालो. विविध प्रश्‍नांवर संसदेत आणि सदनाबाहेर ‘राष्ट्रवादी’ने संघर्ष केला. 

हिंमत असेल तर उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर ढोल वाजवावा
श्री. तटकरे म्हणाले, ‘‘शिवसेना दुटप्पीपणे वागत आहे. सत्तेत भागीदार व्हायचे, निर्णयप्रक्रियेत सहभाग नोंदवायचा आणि सरकारच्या विरुद्ध ढोल वाजवायचे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांच्या घरासमोर ढोल वाजवावा. सत्तेत राहून शेतकरी हितासाठी काही करता येत नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे.’’ 

Web Title: aurangabad news kopardi case sunil tatkare