दहा लाखांचा  रयतू बाजार झाला चाळीस लाखांचा

उदयकुमार जोशी
मंगळवार, 11 जुलै 2017

अहमदपूर - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दहा लाख रुपये खर्चून बांधलेला रयतू बाजार आता चाळीस लाख रुपयांच्या घरात जाऊन पोहोचला असून, अजूनही येथील गाळे रिकामेच आहेत.

अहमदपूर - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दहा लाख रुपये खर्चून बांधलेला रयतू बाजार आता चाळीस लाख रुपयांच्या घरात जाऊन पोहोचला असून, अजूनही येथील गाळे रिकामेच आहेत.

तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी आपले उत्पादन, भाजीपाला शहरात आणून विक्री करावा, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने रयतू बाजार बांधण्यात आला. या ठिकाणी एकूण ५३ गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले. तत्कालीन बाजार समितीचे सभापती दिलीपराव देशमुख यांच्या कार्यकाळात हा रयतू बाजार बांधला गेला. यासाठी पणन मंडळाकडून वर्ष २००३-०४ मध्ये बाजार समितीने दहा लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. रयतू बाजार पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी शेतकरी आपले उत्पादन, भाजीपाला विकतील व पर्यायाने बाजार समितीलाही उत्पन्न होईल असा होरा होता; परंतु रयतू बाजार हा शहरापासून दूर असल्याने शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरविली. पर्यायाने रयतू बाजार रिकामाच राहिला.

कर्ज घेऊन रयतू बाजार बांधला खरा; परंतु त्यापासून काही उत्पन्नच नसल्यामुळे बाजार समितीला पणन मंडळाचे कर्जाचे हप्ते परत करता आले नाहीत. त्यामुळे वर्ष २००३-०४ मध्ये घेतलेल्या दहा लाख रुपयांचे व्याज वाढत गेले. आजमितीला कर्ज व त्यावरील व्याज मिळून बाजार समितीला रयतू बाजाराचे चाळीस लाख रुपये पणन मंडळाला देणे बाकी आहे. 

या रयतू बाजारात सद्यःस्थितीत जनावरांचा बाजार भरतो. या ठिकाणी शहराचा आठवडे बाजारही भरविण्याचा प्रयत्न केला गेला; परंतु तालुक्‍यातील शेतकरी, स्थानिक भाजी विक्रेते यांनी म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अजूनही रयतू बाजार रिकामाच आहे. 

या ठिकाणी रयतू बाजार भरणारच नसेल तर धान्यासाठी गोदाम, शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी शीतगृह, शेतकरी भवन आदी उपयुक्त योजनांसाठी ही जागा वापरता येईल. शिवाय या ठिकाणी दुकानांचेच बांधकाम केले तरीही अडत्यांना ते किरायाने देता येईल. त्यामुळे बाजार समितीला उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होऊ शकेल. रयतू बाजाराची जागा रिकामीच राहण्यापेक्षा त्या ठिकाणी रचनात्मक व उपयुक्त बाबींची निर्मिती व्हावी; तसेच यासाठी बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.

रयतू बाजारासाठी घेतलेल्या कर्ज व व्याजात तडजोड करून बाजार समितीला कर्जमुक्त करावे, यासाठी पणन मंडळाकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्यानंतरच बाजार समितीला उत्पन्न होईल असा एखादा प्रकल्प रयतू बाजाराच्या जागेत राबविता येईल.
- ॲड. भारत चामे, सभापती, बाजार समिती, अहमदपूर.

रयतू बाजारात जागा विस्तृत आहे. त्या ठिकाणी पाण्याचीही सोय आहे; परंतु गावापासून दूर असल्याने या ठिकाणी ग्राहकच येणार नाहीत. त्यामुळे आम्हाला रयतू बाजाराचा उपयोगच होत नाही.
- राजू माळी, भाजी विक्रेते, अहमदपूर.

Web Title: aurangabad news krushi utpanna bazar samiti