मुलाला जीवदान अन्‌ ‘घाटी’ची माणुसकी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जानेवारी 2018

औरंगाबाद - जीबीएस सिंड्रोममध्ये श्‍वासाचा आणि स्नायूंचा पक्षाघात झालेल्या बालकाला साडेतीन महिन्यांच्या उपचाराअंती ‘घाटी’त बरा झाला. आईचा एकमेव आधार असलेल्या ऋषिकेश सुसरला ‘घाटी’ने दिलेले हे जीवदानच म्हणावे लागेल. सोमवारी (ता. आठ) त्याचा तेरावा वाढदिवस साजरा करून निरोप देताना सर्वांचेच डोळे पाणावले होते. 

औरंगाबाद - जीबीएस सिंड्रोममध्ये श्‍वासाचा आणि स्नायूंचा पक्षाघात झालेल्या बालकाला साडेतीन महिन्यांच्या उपचाराअंती ‘घाटी’त बरा झाला. आईचा एकमेव आधार असलेल्या ऋषिकेश सुसरला ‘घाटी’ने दिलेले हे जीवदानच म्हणावे लागेल. सोमवारी (ता. आठ) त्याचा तेरावा वाढदिवस साजरा करून निरोप देताना सर्वांचेच डोळे पाणावले होते. 

भोकरदन तालुक्‍यातील आसईच्या जिल्हा परिषद शाळेत सहावीत शिकत असलेल्या ऋषिकेशचे अचानक एके दिवशी हात-पाय लुळे पडले, श्वास घेणेही अवघड होते. त्यानंतर खासगी रुग्णालयातील डॉक्‍टर उपचार करण्यास नकार देतात; परंतु बालकाच्या मातेला घाटी रुग्णालयातील मेडिसीन विभागात आशेचा किरण मिळतो. तब्बल ६५ दिवस व्हेंटिलेटरवर राहिलेला बालक आता स्वत: श्वास घेऊ लागला आहे. घाटीच्या डॉक्‍टरांच्या अथक परिश्रमामुळे तो स्वतःचे हात-पाय काही प्रमाणात हलवू शकत आहे.

लवकरच तो स्वतः चालू शकेल असे मेडिसीनच्या विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य म्हणाल्या. ऋषिकेशच्या आई मुक्ता यांनी घाटीच्या डॉक्‍टरांमुळे माझ्या मुलाला दुसरा जन्म मिळाल्याचे सांगितले. या वेळी त्यांना गहिवरून आले होते. 

यांचे होते परिश्रम
दरम्यान, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रभाकर जिरवणकर यांचे पथक, एमआयसीयूचे डॉ. वीणा मालाणी, डॉ. सचिन बालकंडे, डॉ. प्रणय जांभूळकर, डॉ. स्नेहा, शीला डिसुजा, हेमलता आठवले, सावित्री राठोड, वॉर्ड आठ-नऊचे डॉ. अजिंक्‍य देशमुख, डॉ. एकनाथ सानप, डॉ. विनोद तोतेवाड, डॉ. शेषाद्री गोवडा, डॉ. रामचंद्र सोनवले यांच्यासह परिचारिक व पीईएस कॉलेजचे प्रा. रमेश पुंगळे यांनीही परिश्रम घेतले. 

के. के. ग्रुपची मदत
तीन महिने ऋषिकेशची रोज काळजी घेणाऱ्या व उपचारासाठी औषधी देऊन मदतीचा हात दिलेल्या के.के. ग्रुपने ऋषिकेशच्या वाढदिवसाचे नियोजन केले होते. या वेळी अकील अहेमद, किशोर वाघमारे, जुनेद शेख, आशू सिद्धीकी, इद्रीस नवाब, जमीर पटेल, महंमद आसेफ यांची या वेळी उपस्थिती होती. 

पोलिसही दिमतीला
ऋषिकेशला आज सुटी मिळाणार अशी माहिती मिळताच बेगमपुरा पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक राजश्री आडे याही वाढदिवसाला आवर्जून उपस्थित झाल्या. ऋषिकेषला त्यांनी बॅट-बॉल भेट दिले. ‘‘लवकरच मैदानावर क्रिकेट खेळताना तुला पाहायचंय; मात्र कुणाच्या घराच्या काचा फोडू नको’, असे त्यांनी म्हणताच गहिवरलेल्या वातावरणात एकच हशा पिकला.

Web Title: aurangabad news life saving humanity ghati hospital