मराठा क्रांती महामोर्चाच्या जागृती रथयात्रेस सुरवात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

औरंगाबाद - मुंबई येथे ९ ऑगस्ट रोजी नियोजित मराठा क्रांती मोर्चाबाबत जनजागृती करण्यासाठी बुधवारी (ता. १२) रथयात्रेस सुरवात करण्यात आली. हडकोतील संभाजी राजे चौकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून रथयात्रेचे उद्‌घाटन झाले. हा रथ कोपर्डीकडे रवाना झाला असून, या पार्श्‍वभूमीवर त्या ठिकाणी गुरुवारी (ता. १३) मराठा क्रांती महामोर्चाची बैठक होणार आहे. 

कोपर्डी येथील निर्भया प्रकरणास गुरुवारी एक वर्ष होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ पहिला क्रांती मोर्चा शहरातून काढण्यात आला होता. कधी नव्हे, अशा या भव्य मूकमोर्चात समाजबांधवांनी सहभाग नोंदवीत एक आचारसंहिता तयार करून दिली. त्यानंतर राज्यातच नव्हे, देश, विदेशांतही मोर्चे निघाले. शांततेत मोर्चे निघूनही सरकारने कोपर्डीप्रश्‍नी दुर्लक्षच केल्याने समाज पुन्हा संतापला आहे. अपेक्षित न्याय न मिळाल्यानेच कोपर्डीसह अन्य प्रश्‍न घेऊन समाजाने महामोर्चाची हाक दिली आहे. मागील महिनाभरापासून राज्यभर याबाबत बैठका घेतल्या जात आहेत. याच पार्श्‍वभूमीवर राज्यभर जागृती निर्माण करण्यासाठी बुधवारी रथयात्रेस सुरवात करण्यात आली. 

या वेळी समाजातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. उद्‌घाटनानंतर हा रथ सायंकाळी नगरला रवाना झाला. तिथे सांयकाळी कॅंडल मार्च काढल्यानंतर हा रथ कोपर्डीत दाखल होईल. गुरुवारी प्रत्येक जिल्ह्यातून मोठ्या संख्येनी समाजबांधव कोपर्डीत दाखल होणार आहेत. तेथे निर्भयाला श्रद्धांजली वाहिल्यानंतर महामोर्चाच्या तयारीबद्दल बैठक होईल. 

‘मिस कॉल’ देण्याचे आवाहन
या मोर्चात सहभागी होण्यासाठी एक मिसकॉल द्यावा. त्यासाठी राज्यव्यापी संपर्क कार्यालयाने (९३५०४११०११) हा अधिकृत क्रमांक जाहीर केला आहे. वेळोवेळी होणारे नियोजन, मोर्चाबद्दलची अधिकृत माहिती संबंधित क्रमांकावर देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे; तसेच गावोगावी, तालुका, जिल्हा अशा विविध ठिकाणी निर्भयाला श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहनही या वेळी करण्यात आले.

Web Title: aurangabad news maratha kranti morcha