औरंगाबाद विभागाचा 88.15 टक्के निकाल

सुषेन जाधव
मंगळवार, 13 जून 2017

दहावी परीक्षेसाठी औरंगाबाद विभागातून 1 लाख 83 हजार 239 विद्यार्थी परीक्षेस बसले होतोय. यापैकी 1 लाख 61 हजार 522 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागातून बीड जिल्ह्याचा निकाल सर्वात जास्त म्हणजे 92.65 टक्के तर सर्वात कमी परभणी जिल्ह्याचा 80.89 टक्के लागला.

औरंगाबाद - राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेचा मंगळवारी (ता. 13) दुपारी 1 वाजता ऑनलाहंईन निकाल जाहीर झाला. यात औरंगाबाद विभागाचा 88.15 टक्के निकाल लागला आहे.

दहावी परीक्षेसाठी औरंगाबाद विभागातून 1 लाख 83 हजार 239 विद्यार्थी परीक्षेस बसले होतोय. यापैकी 1 लाख 61 हजार 522 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विभागातून बीड जिल्ह्याचा निकाल सर्वात जास्त म्हणजे 92.65 टक्के तर सर्वात कमी परभणी जिल्ह्याचा 80.89 टक्के लागला. यंदा मुलांच्या तुलनेत मुलीचे प्रमाण 6.12 टक्‍क्‍यांनी वाढल्याची माहिती परीक्षा मंडळाचे विभागीय अध्यक्ष शिशिर घोनमोडे यांनी दिली.

विभागातून 126 विद्यार्थ्यांचे निकाल प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण वेळेवर न येणे आदी कारणांमुळे राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा कॉपीचे प्रकार कमी झाल्याचेही घोनमोडे म्हणाले. 2016 मध्ये 315 कॉपी प्रकरणे होती तर यंदा 66 प्रकरणे झाली आहेत. कॉप्या पुरविणाऱ्या, पर्यवेक्षकास मारहाण करण्यात आलेल्या केंद्रासंचालक, शिक्षक अशा 9 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. विभागातून एकूण 291 शाळांचा 100 टक्के निकाल लागला असून यात औरंगाबादच्या (105 शाळा)ची सर्वाधिक संख्या आहे.

कला, क्रीडाच्या गुणांमुळे उशिरा निकाल
यंदाच्या निकालापासून विद्यार्थ्यांना चित्रकला, शास्त्रीयकला, लोककला, क्रीडा आदी प्रकारातील कामगिरीसाठी 25 महत्तम गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी प्रत्येक शाळांना बोर्डाकडे प्रस्ताव पाठविण्यासाठीचे पत्रही देण्यात आले होते. विभागातून 5 हजार प्रस्ताव आले होते. हा ऐनवेळी निर्णय घेण्यात आल्याने राज्यभरातून आलेल्या प्रस्तावातून गुण देण्याचे काम रखडल्याने निकाल जाहीर होण्यास गतवर्षीच्या तुलनेत 7 दिवसांचा अधिक कालावधी लागल्याचे घोनमोडे म्हणाले.

Web Title: aurangabad news marathawada news ssc result aurangabad result