औरंगाबादेत चक्क झाडाला लागल्या नोटा! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

औरंगाबाद - झाडाला कधी पैसे लागतात का? असे म्हणतात; मात्र असाच प्रकार आज औरंगाबादेत पाहावयास मिळाला. येथील झाडांवर पैशांची रास लागलेली दिसली. नोटांची रास पाहायला अक्षरश: झुंबड उडाली. नोटाबंदीनंतर जुन्या हजार, पाचशे रुपयांच्या साडेदहा लाखांची रक्कम कोणीतरी चक्क झाडावर फेकून पोबारा केला. हा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. 

पोलिसांनी सांगितले, की सिडकोतील कामगार चौकालगत जंगले यांचा प्लॉट असून, लगतच बाभळीचे झाड आहे. या झाडावर एका नागरिकाची नजर पडली तेव्हा त्याने आश्‍चर्याने चक्क तोंडात बोट घातले. झाडाच्या पालापाचोळ्यावर चलनातून बाद ठरविलेल्या जुन्या हजार, पाचशेंच्या नोटांचा जमिनीवरही खच पडलेला दिसला. पाहता-पाहता ही बाब वाऱ्यासारखी पसरली. दरम्यान, स्थानिकांनी पोलिसांना कळविले. 

पोलिसांनी सर्व नोटा जप्त केल्या. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून त्या ठाण्यात आणण्यात आल्या. मोजदाद केल्यानंतर हजार रुपयाच्या पाचशे नोटा, पाचशे रुपयांच्या अकराशे नोटा, असे एकूण साडेदहा लाख रुपये आढळले. नोटा सीलबंद करून पोलिसांनी या प्रकाराची ठाण्यात नोंद केली. कोणीतरी रातोरात या नोटा फेकल्या असाव्यात, असा संशय पोलिसांना आहे. 

झाडालगत नोटांसोबत पोलिसांना एका सराफ दुकानाचे टॅग सापडले. त्यामुळे या नोटा त्या सराफ दुकानमालकाच्या आहेत का? हे पोलिस तपासत आहेत. 

हवालाचा साठा अद्यापही शिल्लक 
सूत्रांनी माहिती दिली, की गुजरातेत जाणारा हवालाचा पैसा (जुन्या चलनातील) नोटाबंदीच्या काळात ठप्प झाला. ही कोट्यवधींची रक्कम होती. यातील काही "व्हाइट' करण्यात आली; परंतु उर्वरित कोट्यवधींची रक्कम पडून होती. विविध छुप्या मार्गाने हा साठा नष्ट करण्यात आला. बहुतांश जणांकडे अशा नोटा तशाच पडून आहेत.

Web Title: aurangabad news marathwada