औरंगाबादकरांनी घडविले शिस्तीचे दर्शन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - मराठा क्रांती महामोर्चात यावंच लागतंय, अशी हाक देत जनजागरणासाठी येथील मराठा बांधवांनी अथक परिश्रम घेतले. शिवाय, शिस्तीचा आदर्श जपत वेगळेपणही सिद्ध केले. ऐतिहासिक औरंगाबाद शहरात काढलेल्या पहिल्या मोर्चाची आदर्श सुरवात केल्यानंतर मुंबईतील महामोर्चादेखील असाच व्हावा, अशी अनेकांनी व्यक्‍त केलेली अपेक्षा फलद्रूप झाली. या महामोर्चात शिस्त, संयमाचे दर्शन घडावे, कुठेही गालबोट लागू नये, यासाठी अनेक दिवसांपासून करण्यात आलेली मनाची मशागत कारणी लागली. अर्थात त्यासाठी प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष अनेक हात राबले.

औरंगाबाद - मराठा क्रांती महामोर्चात यावंच लागतंय, अशी हाक देत जनजागरणासाठी येथील मराठा बांधवांनी अथक परिश्रम घेतले. शिवाय, शिस्तीचा आदर्श जपत वेगळेपणही सिद्ध केले. ऐतिहासिक औरंगाबाद शहरात काढलेल्या पहिल्या मोर्चाची आदर्श सुरवात केल्यानंतर मुंबईतील महामोर्चादेखील असाच व्हावा, अशी अनेकांनी व्यक्‍त केलेली अपेक्षा फलद्रूप झाली. या महामोर्चात शिस्त, संयमाचे दर्शन घडावे, कुठेही गालबोट लागू नये, यासाठी अनेक दिवसांपासून करण्यात आलेली मनाची मशागत कारणी लागली. अर्थात त्यासाठी प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष अनेक हात राबले.

या मराठा क्रांती महामोर्चासाठी संपर्क कार्यालय उघडण्यापासून बैठका, रथयात्रा, फेऱ्या, त्यानंतर वाहन फेरीच्या माध्यमातून जनजागरण करण्यात आले. ता. एक ऑगस्टला ऐतिहासिक फेरी निघताच मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांत, तालुक्‍यातही अशाच फेऱ्या काढण्यात आल्या. आता लढायचं, अशा विविध लक्षवेधी टॅगलाईन देत सोशल मीडियावर आठवडाभरापासून जोरदार जागरुकता निर्माण करण्याचे काम मराठा बांधवांनी केले.

गतवर्षी क्रांतिदिनीच सुरवात झाली आणि महामूकमोर्चा काढून वर्तुळ पूर्ण झाले. राज्यासह देश, विदेशांत मोठ्या संख्येने; पण शिस्त, संयम ठेवून मोर्चे काढूनही सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संताप व्यक्‍त केला जात असतानाच महामोर्चाची हाक देण्यात आली होती. बैठका, जनजागरणपर कार्यक्रम घेत वातावरणनिर्मिती करण्यात आली होते. त्याचबरोबर सोशल मीडियावरूनही सतत एकच चर्चा, मराठा क्रांती मोर्चा अशा प्रकारच्या मजकुरासोबतच छायाचित्रांद्वारे जनजागृती करण्याचे काम सुरू करण्यात आले. विशेष म्हणजे, शेतकरी बांधवही मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते. त्यामुळे मोर्चाला आणखी धार चढली. ‘खूप झालं इतरांसाठी, आता समाजासाठी’, ‘सकल मराठा समाज’, ‘फक्त मराठा’, ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘नऊ ऑगस्ट क्रांती महामोर्चा’ आदी नावांनी सोशल मीडियावर ग्रुप तयार करीत बुधवारी (ता. नऊ) देखील जगासोबत अपडेट शेअर केले. 

टी-शर्ट, टोपी अन्‌ भगवे झेंडे 
अंगावर काळे टी-शर्ट, महिलांच्या अंगावर काळ्या रंगाच्या साड्या असा ड्रेसकोड या महामोर्चात होता. शहर, जिल्ह्यात २५ हजारांहून अधिक टी-शर्ट, मराठा क्रांती मोर्चा असे लिहिलेल्या टोप्या, वाहनांवर स्टिकर्स आणि भगवे झेंडे यांचे वाटप करण्यात आले होते. शिवाय बहुतांश जणांनी काळ्या रंगाचे ड्रेस खरेदी केले होते. महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात जागरुकता निर्माण झाल्याने महाविद्यालयीन युवतींचा सहभागही लक्षणीय होता.

अंग रंगवून मांडल्या मागण्या 
मुंबई येथील राज्यव्यापी मराठा क्रांती मोर्चात बुधवारी हर्सूल येथील आईसाहेब युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अंग रंगवून मराठा समाजाच्या विविध मागण्या मांडल्या. अंगावर बनियनसारखे रंगवून घेत त्यावर मागण्या लिहिलेल्या या तरुणांनी मोर्चात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये योगेश औताडे, विलास औताडे, संजय जाधव, रविराज औताडे, ज्ञानेश्‍वर व्यवहारे, अमोल दौड, रामेश्‍वर निकम, विनोद तातडे, अमोल कणके, काकासाहेब औताडे यांच्यासह बुलंद छावाचे सुरेश वाकडे यांचा समावेश होता. 

गाड्या पार्किंगसाठी बुलंद छावाचा हातभार 
मराठा क्रांती महामोर्चाच्या नियोजनासाठी औरंगाबादेतील बुलंद छावाचे कार्यकर्ते दोन दिवस आधीच मुंबईला रवाना झाले होते. मोर्चासाठी येणाऱ्या गाड्यांची वडाळा व शेवडी येथे नानासाहेब कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी पार्किगची व्यवस्था केली. तसेच मोर्चेकऱ्यांना बिस्किटचे वाटप केले. यामध्ये मनोज गायके, सतीश वेताळ, प्रदीप हारदे, गिरीश झाल्टे, प्रकाश भोकरे, अभिजित काकडे, तुषार नरवडे, मंगेश शिंदे, भरत दांडगे, किशोर विटेकर, साहेबराव मुळे, ज्ञानेश्‍वर जाधव, ज्ञानेश्‍वर बोरुडे, जनार्दन निकम, विजय गुरव, अनुराग काळे, सुरेश बोर्डे, कानिफनाथ खरात, बाबू चौधरी व विलास पवार यांचा सहभाग होता.

Web Title: aurangabad news marathwada maratha kranti morcha