वर्षाच्या पहिल्या महिन्यातच 56 शेतकऱ्यांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

औरंगाबाद - मागील काही वर्षांपासून विविध संकटांचा सामना करणारे शेतकरी जीवनयात्राच संपवत असल्याचे सातत्याने पुढे येत आहे. ही संकटे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायला तयार नाहीत. यंदा चांगला पाऊस झालेला असला, तरी कपाशी पिकांवर बोंड अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यातच 56 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

मराठवाड्यात मागील वर्षभरात एकूण 991 शेतकऱ्यांनी जीवन संपविल्याची नोंद शासनदरबारी आहे. सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, मुलींचे लग्न अशा विविध कारणांमुळे होणाऱ्या आत्महत्या थांबायला तयार नाहीत. 991 पैकी 740 कुटुंबीयांना सरकारने मदत केली. त्याचबरोबर काही महिन्यांनंतर विशेष कार्यक्रम राबवून त्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभही देण्यात आला आहे. प्रशासन सर्वतोपरी शेतकऱ्यांच्या मागे उभे असल्याचे सतत सांगितले जाते. मात्र, तरीही शेतकरी आत्महत्याचे सत्र थांबत नाही. नववर्षातही हे सत्र सुरूच असल्याचे पुढे आले आहे.

जानेवारी महिन्याच्या अखेर मराठवाड्यात 56 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यात उस्मानाबाद जिल्ह्यातील 12; तर जालना जिल्ह्यातील 10 शेतकऱ्यांचा समावेश आहे. या आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांपैकी 4 कुटुंबे शासकीय मदतीस पात्र ठरली आहेत.

2017 मधील आत्महत्येची आकडेवारी
बीड - 207
उस्मानाबाद - 126
जालना - 91
लातूर - 94
औरंगाबाद - 139
परभणी - 125
हिंगोली - 56
नांदेड - 153

Web Title: aurangabad news marathwada news farmer suicide