मराठा आरक्षणासाठीच "एनडीए'सोबत - नारायण राणे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

औरंगाबाद - मराठा आरक्षणाच्या मुद्यावरच माझा "एनडीए'ला पाठिंबा आहे. मराठ्यांना आरक्षण देण्याची भाजपची मानसिकता आहे, असे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी स्पष्ट केले.

औरंगाबाद - मराठा आरक्षणाच्या मुद्यावरच माझा "एनडीए'ला पाठिंबा आहे. मराठ्यांना आरक्षण देण्याची भाजपची मानसिकता आहे, असे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, 'मी मंत्रिमंडळात आल्यानंतर शिवसेना बाहेर पडेल; पण शिवसेना बाहेर पडली तरी सरकार पडणार नाही. त्यामुळे भाजपने त्यांचा निर्णय लवकर घ्यावा. इथून पुढे जनतेसाठीच झोकून देईन. आता जे बोलेन तेच करीन. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची नोंदणी 15 दिवसांत होईल. त्यानंतर कार्यकर्त्यांना पदे दिली जातील. यापुढच्या काळातील सर्व निवडणुका पक्ष लढविणार आहे,'' असे राणे यांनी सांगितले.

राजस्थानच्या पोटनिवडणुकीत मिळालेल्या कॉंग्रेसच्या यशाबद्दल राणे म्हणाले, 'देशाची भौगोलिक रचनाच अशी आहे, कुठे पाऊस पडतो, कुठे पडत नाही. त्यामुळे तिकडे मतांचा पाऊस पडला म्हणून इकडे घाबरून जाण्याचे कारण नाही.''

मंत्रालय परिसरात, मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आत्महत्या आणि आत्महत्येचे प्रयत्न होत आहेत. यामागे राजकीय पक्ष आहेत का? हे पाहावे लागेल. असे कृत्य करण्यासाठी कोण प्रोत्साहित करते याकडेही लक्ष दिले पाहिजे; मात्र जे होते ते भूषणावह नाही, असे राणे म्हणाले.

अशोक चव्हाण, धनंजय मुंडेंवर निशाणा
'धनंजय मुंडेंनी माझ्या स्वाभिमानाबद्दल बोलू नये. तो जपायला मी समर्थ आहे. तुम्ही लहान आहात. माझ्याविषयी भाष्य करू नका, नाहीतर मी सुरू होईन,'' असा इशाराही राणेंनी दिला. 'मराठवाड्याचे दरडोई उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे. औरंगाबादचे 99 हजार रुपये सोडले, तर बाकी 60 हजारांहून कमी आहे. ज्या नांदेडचे चार वर्षे मुख्यमंत्री राहिले त्या नांदेडचे दरडोई उत्पन्न केवळ 52 हजार रुपये आहे, असे म्हणत त्यांनी नामोल्लेख टाळत अशोक चव्हाणांवर निशाणा साधला. या वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रोसेसिंगवर भर दिल्याने एक लाख 40 हजार दरडोई उत्पन्न असल्याचे राणे यांनी सांगितले.

Web Title: aurangabad news marathwada news maratha reservation nda narayan rane