पदव्युत्तर सीईटी नोंदणीस एक दिवसाची मुदतवाढ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पदव्युत्तर विभाग आणि संलग्नित महाविद्यालयात सुरू असलेल्या ऑनलाइन नोंदणीस एक दिवसाची मुदतवाढ मिळाली आहे. नोंदणी करताना शेवटच्या दिवशी सोमवारी (ता. ३) विद्यार्थ्यांना अडथळे आल्याने एक दिवसाने मुदत वाढवली असून, ४ जुलैला सायंकाळी सहा वाजतापर्यंत नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दिली.

विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग तसेच विद्यापीठाचा उस्मानाबाद कॅम्पस व संलग्नित १२७ महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटीच्या माध्यमातूनच होणार आहेत. प्रवेश प्रक्रियेला १२ जूनपासून सुरवात झाली आहे. १० जुलैला सीईटी घेण्यात येणार आहे. विद्यापीठ कॅम्पसमधील विषय, उस्मानाबाद कॅम्पसमधील पाच विषयांसाठी तसेच विद्यापीठाशी संलग्नित औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद जिल्ह्यात पदव्युत्तर महाविद्यालयांत सीईटी घेण्यात येईल. महाविद्यालयात पदव्युत्तरच्या ७० विषयांसाठी ही सीईटी देणे बंधनकारक आहे.

सीईटी वेळापत्रक पुढीलप्रमाणे ः ऑनलाइन अर्ज दाखल करणे (१२ जून ते ४ जुलै), हॉल तिकीट मिळविणे (४ ते ६ जुलै), प्रवेशपूर्व परीक्षा (१० जुलै), निकाल (१५ जुलै), नोंदणी व ऑप्शन फॉर्म भरणे तसेच कागदपत्रांची तपासणी (१५ ते २५ जुलै), सर्वसाधारण यादी (३० जुलै), प्रथम यादी (एक ऑगस्ट), द्वितीय यादी (सात ऑगस्ट), स्पॉट ॲडमिशन (दहा ऑगस्ट), प्रवेशित ठिकाणी उपस्थिती नोंदविणे (११ ते १४ ऑगस्ट) याप्रमाणे वेळापत्रक आखण्यात आले आहे. ज्या पदवी अभ्यासक्रमांचा निकाल बाकी आहे, तेही विद्यार्थी ४ जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणी करू शकणार आहेत. यासंबंधीची अधिक माहिती विद्यापीठाच्या www.bamu.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Web Title: aurangabad news marathwada university postgraduate CET registrations