एसटी कामगारांचा दिवाळीत संपाची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - एसटी महामंडळातील कामगार कराराचा प्रश्‍न गंभीर वळणावर येऊन ठेपला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि सातवा वेतन आयोग लागू करावा असा एक, तर एसटीचा नियमित करार करावा, असा दुसरा मतप्रवाह आहे. दोन्ही परस्परविरोधी भूमिकेत कामगार करार रखडला आहे. एकूणच रखडलेल्या या प्रश्‍नावर ऐन दिवाळीत एसटी महामंडळाचे कामगार संपावर जाण्याची शक्‍यता बळावली आहे. 

औरंगाबाद - एसटी महामंडळातील कामगार कराराचा प्रश्‍न गंभीर वळणावर येऊन ठेपला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि सातवा वेतन आयोग लागू करावा असा एक, तर एसटीचा नियमित करार करावा, असा दुसरा मतप्रवाह आहे. दोन्ही परस्परविरोधी भूमिकेत कामगार करार रखडला आहे. एकूणच रखडलेल्या या प्रश्‍नावर ऐन दिवाळीत एसटी महामंडळाचे कामगार संपावर जाण्याची शक्‍यता बळावली आहे. 

महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळातील कामगारांचा करार मार्च 2016 मध्ये संपला आहे. नियमित करार करणे आवश्‍यक आहे, मात्र या वेळी कामगारांनी कराराऐवजी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि सातवा वेतन आयोग देण्याची मागणी केल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. मुळात तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला सातवा वेतन आयोग देणे शक्‍य नसल्याची महामंडळाची भूमिका आहे. नियमित वेतन करार करण्यासाठी महामंडळाची तयारी आहे, मात्र त्यासाठी मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटना, एसटी वर्कस कॉंग्रेस इंटक व अन्य काही संघटनांनी विरोध केलेला आहे. 

दरम्यान, कामगारांना काय वाटते यासाठी कामगार संघटनांनी काही दिवसांपूर्वी मतदान घेतले. त्या वेळी जास्तीत जास्त कामगारांनी सातवा वेतन आयोग देण्याची मागणी केली. त्यामुळे एसटी कामगार संघटना व अन्य काही संघटना सातव्या वेतन आयोगाची मागणी करीत आहेत; तर शिवसेना प्रणीत कामगार सेना व अन्य काही संघटनांची वेतन करार करून घेण्याची मागणी आहे. या एकूणच परिस्थितीने वेतन करारासाठी मान्यताप्राप्त संघटना तयार नसल्याने एसटी महामंडळाने वेतन कराराच्या अनुषंगाने कामगारांची थेट मते जाणून घेण्यासाठी उपसमिती नियुक्त केली होती. या समितीने जुलै महिन्यात प्रत्येक विभागात बैठका घेऊन मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्या वेळीही उपसमितीला कामगारांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. अधिकाधिक कामगारांची वेतन आयोग देण्याची मागणी असल्याची नोंद उपसमितीने घेऊन महामंडळाला अहवाल सादर केलेला आहे. 

संपाच्या हालचाली 
एसटी महामंडळ वेतन आयोग देण्याच्या दृष्टीने सकारात्मक नाही, त्यामुळे संप होण्याची शक्‍यता बळावत चालली आहे. एसटी कामगार संघटना व अन्य काही संघटनांची मुंबईत नुकतीच बैठक झाली, या बैठकीत संपासाठी कृती समिती स्थापन करून महामंडळाला रीतसर नोटीस देण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. ही नोटीस देऊन साधारण दिवाळीपूर्वी संप सुरू करावा यावर एकमत झाल्याचे समजते. असे झालेच तर ऐन दिवाळीच्या काळात एसटी महामंडळाच्या कामगारांचा संप होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

Web Title: aurangabad news msrtc st bus employee