महापालिकेचा कोट्यवधींचा भूखंड घशात घालण्याचा डाव 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

औरंगाबाद - कांचनवाडी भागात जीवन प्राधिकरणाच्या ताब्यात असलेल्या महापालिकेच्या भूखंडावर परस्पर मालकी फलक लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारी (ता.21) मालमत्ता विभागाची आढावा बैठक घेत अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यावर एका जागेच्या बदल्यात ही जागा देण्याचा प्रस्ताव अधिकाऱ्यांनी तयार केल्याचे सांगण्यात आले. 

महापालिकेच्या जीवन प्राधिकरणाच्या ताब्यात असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या जागा परत मिळविण्यासाठी श्री. घोडेले यांचे प्रयत्न सुरू आहेत; मात्र अचानक कांचनवाडी येथील जागेवर फलक लागल्याने ते आचंबित झाले. त्यांनी मालमत्ता अधिकारी वामन कांबळे यांच्यासह कर्मचाऱ्यांची सोमवारी बैठक घेतली. त्यात महापालिकेच्या जागा किती आणि कुठे-कुठे आहेत? भाडेकरार संपलेली दुकाने ताब्यात का घेतली नाही? भाडे कराराने दिलेल्या मालमत्ता किती, त्यांना भाडे किती? अनधिकृत होर्डिंग किती आहेत, न्यायालयात किती प्रकरणे आहेत, मालमत्तांची महापालिकेच्या नावे नोंद का होत नाही? अशा प्रश्‍नांची सरबत्ती केली; मात्र अधिकारी-कर्मचाऱ्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. कांबळे यांनी यातील अनेक प्रश्‍न हे नगररचना विभागाशी संबंधित असल्याचे सांगितले. कांचनवाडी येथील भूखंडावर खासगी फलक कसा लागला? अशी विचारणा महापौरांनी केली. त्यावर माहीत नाही, असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे महापौर संतापले. तुम्ही करता काय, साधी कामे तुमच्याकडून होत नाही, अशा शब्दांत त्यांनी खडसावले. 

जागेच्या बदल्यात जागा 
महापालिकेने काही वर्षांपूर्वी रस्त्यासाठी भूसंपादन केले होते. त्याबदल्यात कांचनवाडी येथील जागा देण्याची फाइल एका अधिकाऱ्याने तयार केली आहे; मात्र ती कोणाच्या सांगण्यावरून तयार केली, याचे उत्तर कोणाकडेच नव्हते. 

पाच कोटींची वसुली 
मालमत्ता विभागाच्या उत्पन्नात वाढ करण्यावर सध्या भर दिला आहे. यंदा पाच कोटी 29 लाखांची वसुली केल्याचे कांबळे यांनी सांगितले; मात्र महापौरांनी मी विचारलेल्या प्रत्येक मद्यावर आठ दिवसांत सविस्तर अहवाल सादर करा, असे आदेश दिले. 

Web Title: aurangabad news Municipal Plots issue