पैठण महामार्गाचे अलाईनमेंट १५ दिवसांतच होणार

शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - भारतमाला प्रकल्पात समाविष्ट करण्यात आलेल्या आणि दीर्घकाळ थंड बस्त्यात पडलेल्या औरंगाबाद - पैठण ५० किमी रस्त्याच्या कामाला मूर्त रूप देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणने (एनएचएआय) पाउले टाकायला सुरवात केली आहे. हे सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीला एनएचएआयने या रस्त्याचे संरेखन (अलाईनमेंट) अंतिम करण्याचे आदेश दिले आहेत. 

औरंगाबाद - भारतमाला प्रकल्पात समाविष्ट करण्यात आलेल्या आणि दीर्घकाळ थंड बस्त्यात पडलेल्या औरंगाबाद - पैठण ५० किमी रस्त्याच्या कामाला मूर्त रूप देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणने (एनएचएआय) पाउले टाकायला सुरवात केली आहे. हे सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीला एनएचएआयने या रस्त्याचे संरेखन (अलाईनमेंट) अंतिम करण्याचे आदेश दिले आहेत. 

औरंगाबाद आणि पैठणदरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरण केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा भारतमाला प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. सुमारे सव्वा वर्षापूर्वी चाळणी झालेल्या दुपदरी औरंगाबाद - पैठण रस्त्याला विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने भारतमाला प्रकल्पात या रस्त्याचा समावेश वर्ष २०१५ मध्ये केला होता. पण, त्यानंतर हे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणार की एनएचएआयच्या वतीने करण्यात येणार यावर दीर्घकाल खल सुरू होता. यावर एकदा निविदा प्रक्रियांचा प्रयोग झाल्यानंतरही हा रस्ता जैसे थे राहिला. राजधानी दिल्ली येथे झालेल्या भारतमाला प्रकल्पाच्या आढावा बैठकीत या औरंगाबाद-पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाबाबत चर्चा करण्यात आली. त्यातून या रस्त्याच्या कामाबाबतची चक्रे वेगाने फिरली. या रस्त्याचे या कामातून चौपदरीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठीचे संरेखन १६ ऑगस्टपर्यंत सादर करायचे आदेश हे काम करणाऱ्या कंपनीला देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या रस्त्याचा इन्सेप्शन रिपोर्ट सादर करण्यात आला असून, ऑनलाइन पद्धतीने रस्त्याचा अभ्यासही सध्या सुरू आहे. आता ऑनलाइन पाहण्यात आलेल्या ‘टोपोग्राफी’ची प्रत्यक्षात चाचपणी आगामी आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे. या रस्त्याची अलाईनमेंट अंतिम केल्यानंतर डीपीआर (डिटेल्ड प्रोजेक्‍ट रिपोर्ट) तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या अलाईनमेंट तपासणीच्या कामाचे कंत्राट ईजीआयएस इंडिया या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मुंबई, मुंबई आणि नागपूर मेट्रोच्या कामात सहभागी असलेल्या कंपनीला देण्यात आले आहे. 

बिडकीनपर्यंत सर्व्हिस रोड 
औरंगाबाद ते पैठणदरम्यानच्या रस्त्यावरील वर्दळ लक्षात घेता या चारपदरी रस्त्यावर वाहनांची संख्या मोठीच राहणार आहे, हे लक्षात घेऊन औरंगाबाद ते बिडकीनदरम्यानच्या रस्त्यालगत सर्व्हिस रोड देण्यासाठी चाचपणी केली जाणार आहे. हा सर्व्हिस रोड झाल्यास औरंगाबाद बिडकीनदरम्यानची बरीच वाहतूक मुख्य रस्त्यापासून बाजूला होईल आणि पर्यायाने अपघातांची संख्या घटवण्यास मदत होणार आहे. याशिवाय शेंद्रा, बिडकीन, पैठण रोडमार्गे औरंगाबाद शहरादरम्यान बीआरटी आणि भविष्यात येऊ घातलेल्या मेट्रो प्रकल्पांच्या माध्यमातून ‘वेगवान दळणवळण’ करण्यासाठी फायद्याचे ठरणार आहे.

शेंद्रा-बिडकीन रस्त्याचीही चाचपणी
नव्याने उभारण्यात येणाऱ्या शेंद्रा-बिडकीनदरम्यानच्या लिंक रोडच्या अलाईनमेंट तपासणीचे कामही पैठण रस्त्याचे सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीलाच मिळालेले असल्याने लगोलग या रस्त्याचीही अलाईनमेंट तपासण्यात येणार आहे. त्यामुळे या रस्त्याचे कामही मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. या रस्त्याच्या अलाईनमेंटचा अहवाल सादर करण्यासाठी तारीख ठरवण्यात आलेली नसली तरी हे कामही औरंगाबाद - पैठण रस्त्याच्या साथीनेच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Web Title: aurangabad news paithan highway