रस्त्यावर पार्किंग करणाऱ्यांकडून शुल्क वसूल करा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

पार्किंग शुल्काचा प्रस्ताव प्रशासनाला योग्य वाटल्यास त्याचा अभ्यास करून सर्वसाधारण सभेसमोर धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. निविदा प्रक्रिया राबवून हे काम खासगी संस्थेला द्यावे लागणार आहे. 
- गजानन बारवाल, स्थायी समिती सभापती. 

औरंगाबाद - पार्किंगसाठी रस्त्यांचा वापर करणाऱ्या शहरातील खासगी, व्यावसायिक वाहनधारकांकडून दरमहा किमान शंभर रुपये शुल्क वसूल करण्यात यावे, असा प्रस्ताव स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांनी महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्याकडे शनिवारी (ता. 20) सादर केला. 

शहरातील रस्त्यांचा वाहनधारकांकडून पार्किंगसाठी सर्रासपणे वापर केला जात आहे. प्रत्येक इमारतीला पार्किंगसाठी जागा सोडणे बंधनकारक असताना रस्त्यांवर वाहने उभी केली जातात. महापालिकेच्या जागांचा मोफत वापर करणाऱ्यांकडून शुल्क घेतल्यास उत्पन्नात वाढ होणार आहे. यासंदर्भात दिलेल्या पत्रात म्हटले आहे, रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या व्यावसायिक, खासगी चारचाकी वाहनधारकांकडून पार्किंग शुल्क वसूल करण्याचे अधिकार महापालिकेला आहेत. त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर वाहनधारकांकडून महिना किमान शंभर रुपये शुल्क आकारण्यात यावे. मुंबई, पुणे शहरांमध्ये पार्किंग शुल्क आकारण्यात येते. शहरातील वाहनांची संख्या किमान तीन लाखांच्या घरात असून, त्यातील निम्म्या जणांनी पार्किंग शुल्क भरल्यास कोट्यवधींचा महसूल जमा होईल. त्यासाठी खासगी कंत्राटदार नियुक्त करता येईल. महापालिका स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत शहरात सीसीटीव्ही लावणार आहे. त्यामुळे खासगी वाहने सुरक्षित राहतील. त्यामुळे नाममात्र पार्किंग शुल्क देण्यास वाहनधारकांचीदेखील हरकत राहणार नाही. शहरातील खुल्या जागांवरदेखील पार्किंग केली जाते. ज्या उद्दिष्टासाठी जागा सोडल्या आहेत, तो उद्देश बाजूला राहतो. त्यामुळे या ठिकाणीदेखील पार्किंग शुल्क आकारण्यात यावे, असेही पत्रात नमूद केले आहे. 

Web Title: aurangabad news parking amc