पोहालला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - घाटीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बारा जणांकडून प्रत्येकी दोन लाखप्रमाणे एकूण चोवीस लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या राजेंद्र चरणसिंग पोहाल याला न्यायालयाने सोमवारपर्यंत (ता. 30) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. 

औरंगाबाद - घाटीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बारा जणांकडून प्रत्येकी दोन लाखप्रमाणे एकूण चोवीस लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या राजेंद्र चरणसिंग पोहाल याला न्यायालयाने सोमवारपर्यंत (ता. 30) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. 

पोहालला न्यायालयात हजर केल्यानंतर सहायक सरकारी वकील सय्यद शहेनाज यांनी न्यायालयास विनंती केली, त्याने तक्रारदार किशोर देहाडे व इतरांकडून घेतलेल्या एकूण 24 लाख रुपयांचा काय विनियोग केला. त्या रकमेची कुठे गुंतवणूक केली याबाबत विचारपूस करून ती रक्कम जप्त करावयाची आहे. त्याने दिलेले बनावट नियुक्ती आदेश कुठे तयार केले, त्या नियुक्ती आदेशावर अधिष्ठाता यांच्या नावाने कोणी खोट्या व बनावट सह्या केल्या याबाबत पोहालकडे विचारपूस करून संगणक व शिक्के जप्त करावयाचे आहेत. या रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे याबाबत पोहालकडे विचारपूस करून त्यांची नावे निष्पन्न करून त्यांना अटक करावयाची आहे. त्याने कक्षसेवक पदासाठी 48 आणि लिपिक पदासाठी 50 अशा एकूण 98 सुशिक्षित बेरोजगारांना खोटे व बनावट नियुक्ती आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने तपास करून पुरावे हस्तगत करावयाचे आहेत. पोहालने अधिष्ठातांच्या नावाचा शिक्का कोठे तयार केला याबाबत तपास करून पुरावा हस्तगत करावयाचा आहे. सदर प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, यात फसवणुकीची रक्कम वाढण्याची शक्‍यता आहे. म्हणून पोहालची बारकाईने विचारपूस करून संपूर्ण रॅकेट उघडकीस आणणे आवश्‍यक आहे. त्यामुळे त्याला सात दिवसांची पोलिस कोठडीची विनंती सरकारी वकील सय्यद शहेनाज यांनी न्यायालयाकडे केली असता न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला. 

Web Title: aurangabad news Police custody