विशेष रेल्वेगाड्यांत पुन्हा जालना, औरंगाबादवर अन्याय 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

औरंगाबाद - दक्षिण मध्य रेल्वेचा मराठवाड्यावर अन्याय सुरूच आहे. दिवाळी-दसऱ्याच्या अनुषंगाने जयपूरसाठी रेल्वेगाड्यांच्या 22 फेऱ्या सुरु करण्यात आल्या. मात्र, त्यातून जालना आणि औरंगाबादला वगळण्यात आले. हा अन्याय दूर करण्याची मागणी मराठवाडा रेल्वे विकास समितीने केली आहे. 

औरंगाबाद - दक्षिण मध्य रेल्वेचा मराठवाड्यावर अन्याय सुरूच आहे. दिवाळी-दसऱ्याच्या अनुषंगाने जयपूरसाठी रेल्वेगाड्यांच्या 22 फेऱ्या सुरु करण्यात आल्या. मात्र, त्यातून जालना आणि औरंगाबादला वगळण्यात आले. हा अन्याय दूर करण्याची मागणी मराठवाडा रेल्वे विकास समितीने केली आहे. 

दक्षिण मध्य रेल्वे विभाग गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाड्यावर अन्याय करीत असल्याची भावना निर्माण झालेली आहे. पर्यटनाची राजधानी असलेल्या मराठवाड्यातून दिवाळी, दसऱ्यासाठी जादा गाड्या सोडण्याची मागणी केली असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. जयपूरसाठी पूर्णा मार्गे रेल्वेगाड्यांच्या 22 फेऱ्या करण्यात आल्या. मात्र, त्यातून औरंगाबाद आणि जालना वगळण्यात आले आहे. या दोन्ही ठिकाणांहून पुरेसा प्रवासी वर्ग असतानाही दक्षिण मध्य रेल्वे जाणिवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची भावना येथील प्रवाशांमध्ये बळावली आहे. आगामी सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन, तातडीने नांदेड - दौंड रेल्वेचा औरंगाबादपर्यंत विस्तार करावा. सिकंदराबाद - नांदेड - औरंगाबाद - मनमाड - जोधपूर रेल्वेगाडी सुरु करावी. त्याचप्रमाणे औरंगाबादेतून रात्री आठला निघून नागपूरला सकाळी आठ वाजता पोहचता येईल, अशी नागपूर सर्वोदय एक्‍स्प्रेस गाडी सुरु करावी. पूर्णा - पाटणा एक्‍स्प्रेसचा औरंगाबादपर्यंत विस्तार करावा. मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावरुन पन्नास हजार तिकिटांची विक्री होत असल्याने जनशताब्दी, तपोवन एक्‍स्प्रेस गाड्यांना एक मिनिटाचा थांबा देण्यात यावा. सण-उत्सवांच्या काळात रेल्वेगाड्यांचे डबे वाढविण्यात यावेत. नांदेड - औरंगाबाद - मुंबई एक्‍स्प्रेस गाडी सुरु करावी. त्याचप्रमाणे सचखंड, कोल्हापूर, धनबाद, चेन्नई, अजमेर, जयपूर या सर्व रेल्वेगाड्या नोव्हेंबर 2017 पर्यंत फुल्ल असल्याने नवीन विशेष रेल्वेगाडीची व्यवस्था करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनी दक्षिण मध्य रेल्वेचे महाप्रबंधक विनोदकुमार यादव, विभागीय रेल्वे व्यवस्थापक ए. के. सिन्हा यांना भेटून सविस्तर चर्चा करुन निवेदन दिले. 

रेल्वेचे महाप्रबंधक विनोदकुमार यादव यांनी नांदेड - औरंगाबाद मार्गे वैष्णोदेवीसाठी विशेष रेल्वेगाडी सुरु करण्याचा आणि चिकलठाणा रेल्वेस्थानक परिसरात पीटलाईनची (रेल्वेगाडीची दुरुस्ती) व्यवस्था करण्याचे आश्‍वासन दिले आहे. 
- ओमप्रकाश वर्मा, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे विकास समिती. 

 

Web Title: aurangabad news railway