पावसाच्‍या हजेरीने जिल्ह्यात पेरणीची लगबग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

औरंगाबाद - जिल्‍ह्यात ठिकठिकाणी गुरुवारी (ता.८) पावसाचे जोरदार आगमन झाले. या मॉन्सूनपूर्व पावसाने नदी-नाले ओसंडून  वाहू लागले आहेत.  त्यामुळे शेतकरी सुखावले असून, ते पेरणीच्‍या कामाला लागलेत.

औरंगाबाद - जिल्‍ह्यात ठिकठिकाणी गुरुवारी (ता.८) पावसाचे जोरदार आगमन झाले. या मॉन्सूनपूर्व पावसाने नदी-नाले ओसंडून  वाहू लागले आहेत.  त्यामुळे शेतकरी सुखावले असून, ते पेरणीच्‍या कामाला लागलेत.

अंभई परिसरात पेरणीच्या कामांना वेग
अंभई - अंभई (ता.सिल्लोड) व परिसरात ३१ मे पासून रोहिणी नक्षत्रात चार-पाच वेळा मॉन्सून पूर्व दमदार पाऊस झाला. त्यानंतर जमिनीत पेरणीयोग्य ओलावा निर्माण झाल्यामुळे बुधवारपासून (ता.सात) पेरणीच्या कामांनी वेग घेतला आहे. परिसरातील मुख्य पीक असलेल्या मक्‍याच्या लागवडीला शेतकऱ्यांनी सुरवात केली आहे. मकानंतर कपाशी हे नगदी पीक लावणीकडे शेतकऱ्यांचा कल असतो. गेल्या वर्षी सोयाबीनला योग्य बाजारभाव न मिळाल्यामुळे सोयाबीनचा पेरा कमी होणार असे चित्र दिसत आहे. परिसरात मका, कापूस, सोयाबीन ही प्रमुख पिके असून हायब्रीड ज्वारी, आंतरपीक म्हणून उडीद, मूग, तूर या पिकांची काही प्रमाणात पेरणी केली जाते.

आमठाणा येथे पेरणीची लगबग सुरू
आमठाणा - आमठाणा (ता. सिल्लोड) परिसरात बुधवारी (ता. सात) चांगला पाऊस झाल्याने पेरणीची लगबग सुरू झाली आहे. आमठाणा, केळगाव, धावडा, देऊळगाव बाजार, शिंदेफळ, तळणी, चारनेर, पेंडगाव व वाडी येथे शेतकरी कपाशी, तूर, मूग व उडीद लागवडीला सुरवात केली आहे. मॉन्सूनपूर्व पावसाने गेल्या चार दिवसांपासून हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरवात केली आहे.  काही भागांत कमी तर काही जास्त पाऊस पडल्याने पेरणी कमी-अधिक प्रमाणात सुरू आहे.

Web Title: aurangabad news rain agriculture Sowing