शहरात अडीच तास दमदार बरसला!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

औरंगाबाद - मॉन्सूनपूर्व पावसाने शहरात जोरदार हजेरी लावली होती; मात्र मॉन्सूनच्या पावसाची औरंगाबादकरांना वाट पाहावी लागली. अखेर बुधवारी (ता. १४) शहरात सुमारे अडीच तास मॉन्सून बरसला. या पावसाची चिकलठाणा वेधशाळेत ४० मिलिमीटर एवढी नोंद झाली आहे.  

औरंगाबाद - मॉन्सूनपूर्व पावसाने शहरात जोरदार हजेरी लावली होती; मात्र मॉन्सूनच्या पावसाची औरंगाबादकरांना वाट पाहावी लागली. अखेर बुधवारी (ता. १४) शहरात सुमारे अडीच तास मॉन्सून बरसला. या पावसाची चिकलठाणा वेधशाळेत ४० मिलिमीटर एवढी नोंद झाली आहे.  

उन्हाळ्यातील तापमानाच्या वाढत्या पाऱ्यामुळे शहरवासीय तीन महिने घामाघूम झाले; मात्र मे महिन्यात शेवटच्या आठवड्यातच नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. ऊन-सावल्यांच्या खेळानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. तीन वेळा बरसलेल्या या पावसाची एकूण ५६ मिलिमीटर नोंद करण्यात आली होती. मॉन्सूनचे वारे लांबल्याने शहरात दुसऱ्या आठवड्यात पावसाने ओढ दिली होती. सुमारे तीन दिवस उशिराने औरंगाबादेत दाखल झालेल्या मान्सूनचा पाऊस बुधवारी शहरावर जोरदार बरसला. सायंकाळी साडेपाचपर्यंत या पावसाची चिकलठाणा वेधशाळेत ४० मिलिमीटर नोंद करण्यात आली. सकाळी कडक उन्हामुळे नागरिक घामाघूम होत असतानाच दुपारी अडीचला अचानक पावसाला सुरवात झाली. सुरवातीला मुसळधार आलेला हा पाऊस नंतर पाच वाजेपर्यंत रिमझिम बरसला. दक्षिण मराठवाड्याच्या तुलनेने औरंगाबादेत मॉन्सून तीन ते चार दिवस उशिराने दाखल झाला. पावसासाठी आवश्‍यक असलेले पोषक वातावरण तयार होत नसल्याने पावसाने औरंगाबाद आणि परिसरात ओढ दिली असल्याची माहिती पर्यावरणाचे अभ्यासक आणि खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिली. बुधवारी पावसाची नोंद ४० मिलिमीटर झाली असली तरी आगामी काही दिवसांत मोठे पाऊस पडण्याची शक्‍यता कमी असल्याचा अंदाज औंधकर यांनी व्यक्त केला. दरम्यान, बुधवारी पाऊस जोरदार बरसला असला, तरी शहरात दशमेशनगरमध्ये पाणी शिरल्याची घटना वगळता कोणत्याही घटनेची नोंद झाली नसल्याची माहिती अग्निशामक विभागाच्या वतीने देण्यात आली.

Web Title: aurangabad news rain monsoon