तुम्‍ही नसलात तरी आम्‍ही लढूच! - राम शिंदे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

औरंगाबाद - आम्ही २०१४ मध्ये विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढलो. तेव्हा भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या. आताही शिवसेना सोबत आली तर ठीक, नसता त्यांच्याशिवाय लढण्याची आमचीही तयारी आहे, असा टोला गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी रविवारी (ता. २८) शिवसेनेला लगावला.

औरंगाबाद - आम्ही २०१४ मध्ये विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढलो. तेव्हा भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या. आताही शिवसेना सोबत आली तर ठीक, नसता त्यांच्याशिवाय लढण्याची आमचीही तयारी आहे, असा टोला गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी रविवारी (ता. २८) शिवसेनेला लगावला.

गुणिजन साहित्य संमेलनासाठी शहरात आलेल्या राम शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेनेने स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे, याकडे लक्ष वेधले असता शिवसेना कधीच आमच्यासोबत नव्हती, असे ते म्हणाले. सरकार स्थापनेच्या वेळीदेखील शिवसेना विरोधात होती. नंतर कळत-नकळत ते सत्तेत सहभागी झाले. गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून ते विरोधकांची भूमिका वठवीत असल्याचा आरोपही राम शिंदे यांनी केला. स्वबळाची भविष्यवाणी शिवसेनेने केली असली, तरी भविष्यातला मित्रपक्ष म्हणून त्यांना सोबत घेऊन जाण्याची भाजपची भूमिका आहे. याउपरही शिवसेना भूमिकेवर ठाम राहिली, तर आपलीही तयारी असल्याचा इशारा राम शिंदे यांनी या वेळी दिला.

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मंत्रिपदावरून हटविण्यात आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलेली नाराजी आणि दुसऱ्या पर्यायाचा दिलेला इशारा यावर राम शिंदे यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘‘नाथाभाऊ आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून त्यांनी पक्षाला मोठे केले आहे. त्यामुळे त्यांनी प्रसारमाध्यमांकडे व्यथा बोलून दाखविणे यात गैर काही नाही. एकनाथ खडसे यांचे प्रश्‍न पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून निश्‍चितच सोडविले जातील, असे ते म्हणाले.’’

मुख्यमंत्री गृहखात्यासाठी सक्षम 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहखाते प्रभावीपणे सांभाळत आहेत. त्यामुळे स्वतंत्र गृहमंत्र्यांची गरज नसल्याचे मत श्री. शिंदे यांनी व्यक्त केले. कोरेगाव-भीमासारखे प्रकरण मुख्यमंत्र्यांनी काळजीपूर्वक हाताळले. राज्यातील सलोख्याचे वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला, तरी मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन दंगेखोरांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते, असे राम शिंदे यांनी या वेळी स्पष्ट केले.

Web Title: aurangabad news ram shinde talking