प्रवासी बसताच दिसणार रिक्षाची कुंडली!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

औरंगाबाद - ऑटो रिक्षामध्ये प्रवासी बसताच त्याला दिसेल अशा पद्धतीने रिक्षाची, मालकाची व चालकाची माहिती लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

औरंगाबाद - ऑटो रिक्षामध्ये प्रवासी बसताच त्याला दिसेल अशा पद्धतीने रिक्षाची, मालकाची व चालकाची माहिती लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रिक्षाचालकांनी फसवणूक करण्याचा प्रकार नवीन नाही, रिक्षा प्रवाशाला रात्री-अपरात्री लुटण्याचे प्रकार घडलेले आहेत. म्हणून राज्य परिवहन प्राधिकरण समितेन ऑटो रिक्षा, काळी-पिवळी व स्कूल कॅब या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना त्यांच्या संपूर्ण माहितीचे स्टिकर दर्शनी भागात लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर अंमलबजावणी करण्याचा निर्णय औरंगाबाद प्रादेशिक परिवहन प्राधिकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार शहरातील ऑटो रिक्षा, काळी-पिवळी वाहनांमध्ये यापुढे वाहनधारकाचा तपशील, परवान्याचा तपशील, वाहन व वाहनचालकाचा तपशील; तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी पोलिस हेल्पलाइन, परिवहन कार्यालयाचे फोन क्रमांक दर्शविणारे स्टिकर चिकटविण्यात येणार आहेत. यासाठी परिवहन विभागातर्फे वाहनधारकांसाठी स्टिकर दिले जाणार आहेत. हे स्टिकर जानेवारीअखेर पूर्ण करून फेब्रुवारीपासून प्रत्येक रिक्षा व काळी-पिवळीमध्ये दर्शनी भागात प्रवासी बसताच त्याला दिसेल अशा पद्धतीने चिकटविले जाणार आहे. यासाठी वाहनधारकांनी परिवहन विभागाशी संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दंडात्मक कारवाईची तरतूद
वाहनामध्ये तपशील लावला नाही, तर परवाना पहिल्या पाच दिवसांसाठी निलंबित करणे किंवा निलंबनाऐवजी एक हजार रुपये तडजोड शुल्क भरून घेणे. दुसऱ्या गुन्ह्यासाठी दहा दिवस परवाना निलंबित अथवा तीन हजार रुपये तडजोड शुल्क आणि तिसऱ्या गुन्ह्यासाठी परवाना पंधरा दिवसांसाठी निलंबित अथवा पाच हजार रुपये तडजोड शुल्क घेणे अशा पद्धतीची कारवाई केली जाणार आहे.

Web Title: aurangabad news rickshaw record