राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष संभाजी म्हसे यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

मुळचे नगरचे संभाजी म्हसे यांनी वकिली करत नंतर औरंगाबाद आणि मुंबई उच्च न्यायालयात न्यायमुर्ती म्हणून काम पाहिले. निवृत्त झाल्यानंतर ते ग्राहक मंचाचे अध्यक्ष होते. वर्षभरापासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न ऐरणीवर आल्यानंतर राज्य सरकारने 4 जानेवारी 2017 ला राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी निवड केली होती.

औरंगाबाद : राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा निवृत्त न्यायमूर्ती संभाजी म्हसे पाटील (वय 72) यांचे शुक्रवारी (ता. 2) रात्री साडेअकरा वाजता एमजीएम हॉस्पिटलमध्ये निधन झाले.

श्री. म्हसे यांना एक महिन्यापूर्वी नगरहून औरंगाबाद एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पंधरा दिवसापूर्वी त्यांना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले होते. दोन दिवस घरी थांबल्यानंतर पुन्हा त्यांना त्रास होऊ लागल्याने पंधरा दिवसांपुर्वी एमजीएममध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या दोन्ही किडन्या निकाम्या झाल्या होत्या. उपचार सुरु असतानाच त्यांना शुक्रवारी (ता. 2) रात्री हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचे निधन झाले. 

मुळचे नगरचे संभाजी म्हसे यांनी वकिली करत नंतर औरंगाबाद आणि मुंबई उच्च न्यायालयात न्यायमुर्ती म्हणून काम पाहिले. निवृत्त झाल्यानंतर ते ग्राहक मंचाचे अध्यक्ष होते. वर्षभरापासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न ऐरणीवर आल्यानंतर राज्य सरकारने 4 जानेवारी 2017 ला राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी निवड केली होती. गरजु लोकांपर्यंत आरक्षण पोहचावे, यासाठी ते अभ्यास करत होते. नगरमध्ये जिल्हा न्यायालयाच्या मागील वसाहतीत ते रहायला होते. तर, नगर येथील दिल्ली गेटच्या बाजुला अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

Web Title: Aurangabad news Sambhaji Mhase passed away