सयाजी शिंदे यांच्या संस्थेची नोंदणी एका तासात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

औरंगाबाद - धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या कामकाजाचे स्वरूप बदलले असून, संपूर्ण डिजिटल झालेल्या धर्मादाय विभागाच्या औरंगाबाद विभागाने अवघ्या एका तासात संस्था नोंदणीचा विक्रम केला आहे. एका तासात संस्था नोंदणीची राज्यातील पहिलीच घटना ठरली आहे. अभिनेता सयाजी शिंदे यांच्या संस्थेला नोंदणी करून हे प्रमाणपत्र देण्यात आले.   

औरंगाबाद - धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या कामकाजाचे स्वरूप बदलले असून, संपूर्ण डिजिटल झालेल्या धर्मादाय विभागाच्या औरंगाबाद विभागाने अवघ्या एका तासात संस्था नोंदणीचा विक्रम केला आहे. एका तासात संस्था नोंदणीची राज्यातील पहिलीच घटना ठरली आहे. अभिनेता सयाजी शिंदे यांच्या संस्थेला नोंदणी करून हे प्रमाणपत्र देण्यात आले.   

धर्मादाय आयुक्त कार्यालयाने गेल्या काही दिवसांमध्ये कामकाजात आमूलाग्र बदल केले आहेत. राज्याचे आयुक्त शशिकांत सावळे हे काही दिवसांपूर्वी शहरात आले होते, त्या वेळी त्यांनी संपूर्ण प्रक्रिया डिजिटल करण्यात येत असल्याचे सांगितले होते. हे काम युद्धपातळीवर करण्यात आले आहे. डिजिटायझेशनमुळे राज्यातील सर्व धर्मादाय कार्यालयांतील कार्यप्रणाली ऑनलाइन झाली आहे. त्यामुळे कामाचा प्रचंड वेग वाढला असून, फायली निपटारा होण्याचे प्रमाणही वाढले आहे. धर्मादाय संस्थांची नोंदणी वेगाने होण्यासाठी धर्मादाय उपायुक्त विवेक सोनुणे, सहायक धर्मादाय आयुक्त एस. व्ही. एच. कादरी, समाधान मुळे, भाग्यश्री पाटील यांचा विशेष प्रयत्न सुरू आहे. या प्रणालीचा अधिकाधिक उपयोग करून घ्यावा असे आवाहन अधीक्षक प्रकाश जोशी, संजय जोशी, हनुमंत येवले यांनी केले. 

तासाभरात प्रमाणपत्र
प्रसिद्ध मराठी अभिनेता सयाजी शिंदे यांची इर्जिक फाउंडेशन नावाची संस्था आहे. या संस्थेच्या मार्फत मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जलसंधारण व समाजोपयोगी कार्य करण्याचा त्यांचा मानस आहे. या संस्थेच्या नोंदणीसाठी सह धर्मादाय आयुक्त (औरंगाबाद) कार्यालयात प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. धर्मादाय सह आयुक्त श्रीकांत भोसले यांनी अवघ्या एका तासात संस्थेची नोंदणी करून सयाजी शिंदे यांना प्रमाणपत्र प्रदान केले. या वेळी इर्जिकचे सचिव प्रा. रवींद्र बनसोड यांची प्रमुख उपस्थिती होती. 

धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या डिजिटायजेशननंतर अवघ्या एका तासात संस्था नोंदणी करून प्रमाणपत्र देण्याचा राज्यातील पहिलाच विक्रम आहे. यामध्ये वकिलांनी अधिकाधिक सहभाग घेतल्यास कामाला आणखी गती येऊ शकते. 
-ॲड. प्रमोद दादा पवार, मराठवाडा धर्मादाय वकील संघाचे माजी अध्यक्ष.

Web Title: aurangabad news sayaji shinde