महापौर, आयुक्तांच्या चीन दौऱ्याला शिवसेनेचा विरोध 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

औरंगाबाद - महापौर, आयुक्तांचा चीन दौरा वादात सापडला असून, चीनने केवळ भाजप पदाधिकाऱ्यांनाच निमंत्रण पाठविले आहे का?, असा सवाल करीत सभागृहनेते गजानन मनगटे यांनी या दौऱ्याला विरोध केला आहे. पावसाळ्यामुळे शहरात आपत्कालीन स्थिती आहे, वसुली नाही, अशा स्थितीत चीनला जाऊन महापौर, आयुक्त काय अभ्यास करणार आहेत, त्याचा शहराला काय फायदा, असा आक्षेप मनगटे यांनी घेतला.

औरंगाबाद - महापौर, आयुक्तांचा चीन दौरा वादात सापडला असून, चीनने केवळ भाजप पदाधिकाऱ्यांनाच निमंत्रण पाठविले आहे का?, असा सवाल करीत सभागृहनेते गजानन मनगटे यांनी या दौऱ्याला विरोध केला आहे. पावसाळ्यामुळे शहरात आपत्कालीन स्थिती आहे, वसुली नाही, अशा स्थितीत चीनला जाऊन महापौर, आयुक्त काय अभ्यास करणार आहेत, त्याचा शहराला काय फायदा, असा आक्षेप मनगटे यांनी घेतला.

चीनमधील ड्युहाँग हे शहर राज्यशासनाने ‘सिस्टर सिटी’ म्हणून औरंगाबादसोबत जोडले आहे. या शहरात ड्युहाँग सिटी ब्रिक्‍स फ्रेंडशिप सिरीज ॲण्ड लोकल गव्हर्नमेंट फोरमतर्फे ‘इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट’ या विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी महापौर, आयुक्तांसह पाच जणांच्या शिष्टमंडळाला निमंत्रण देण्यात आले असून, याचा खर्च चीन सरकार करणार आहे. १४ ते १७ जुलै दरम्यान परिषद होणार आहे. त्यानुसार १२ जुलैला आयुक्त, पदाधिकारी चीन दौऱ्यावर जाणार आहेत. दौरा जाहीर झाल्यापासून पाच जणांच्या शिष्टमंडळात आपला समावेश व्हावा, यासाठी पदाधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. महापौर भगवान घडामोडे, आयुक्त डी. एम. मुगळीकर यांची नावे अंतिम आहेत; तर उर्वरित तिघांमध्ये उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृहनेता, विरोधीपक्षनेता, प्रभारी शहर अभियंता व भाजप गटनेता यांची नावे चर्चेत होती. त्यात सभागृहनेता गजानन मनगटे यांनी चीन दौऱ्याला शिवसेनेचा विरोध जाहीर केला. 

श्री. मनगटे म्हणाले, ‘‘महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यात हा दौरा महापालिकेला परवडणारा आहे का?  वसुली नाही, पावसाळा सुरू आहे. त्यामुळे आपत्कालीन स्थिती असून, थोडा मोठा पाऊस झाला की, नाल्याचे पाणी अनेक भागांत घुसते. आयुक्त, महापौरांनी शहरात थांबणे गरजेचे आहे. चीनने फक्त भाजप पदाधिकाऱ्यांनाच बोलाविले आहे का? चीनमध्ये जाऊन हे काय अभ्यास करणार, त्याचा शहराला काय फायदा’’, असा आक्षेप श्री. मनगटे यांनी घेतला. यावेळी उपमहापाैर स्मिता घोगरे यांची उपस्थिती होती.
 

शहराची काळजी नसेल तर जा 
चीन दौऱ्याला जाऊ नये, अशी विनंती करण्यासाठी महापौरांना फोन केला होता; मात्र त्यांनी फोन घेतला नाही. शहराची काळजी असेल; तर त्यांनी चीनला जाऊ नये, असे आवाहन करतानाच सध्या भारत-चीनमधील संबंध तणावपूर्ण असल्याने धोका असल्याची आठवण श्री. मनगटे यांनी करून दिली.

मित्रपक्ष सक्षम नाही का?
या संदर्भात प्रतिक्रिया देताना महापौर भगवान घडामोडे म्हणाले, ‘‘महापालिकेत युतीची सत्ता आहे. आम्ही दौऱ्यावर जात असलो तरी उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभागृहनेते शहरातच आहेत. आपत्कालीन परिस्थितीत मित्रपक्षाचे पदाधिकारी सक्षम नाहीत का? भाजप पदाधिकारी बाहेर गेले म्हणजे शहरात कामे होऊ शकत नाही, असे सभागृहनेत्यांना म्हणायचे आहे का? असा प्रश्‍न त्यांनी केला. सभागृहनेत्यांच्या पत्रावरून शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांचे नाव दौऱ्यासाठी घेतले होते, ते नावात बदल करू शकतात.

Web Title: aurangabad news shiv sena china tour