स्वबळासाठी शिवसेनेची तयारी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

औरंगाबाद - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी (ता. 19) शहरात येत आहेत. मराठवाड्यातील आठ व इतर चार अशा 12 लोकसभा मतदारसंघांचा ते आढावा घेणार असून, त्यासाठी खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुखांना चर्चेसाठी बोलविण्यात आले आहे. 

शिवसेनेकडून स्वबळाची भाषा अद्यापही सुरू आहे. भाजपने मुंबईतील मेळाव्यात युतीसाठी हात पुढे केला होता. या पार्श्‍वभूमीवर श्री. ठाकरे गुरुवारी शहरात येत आहेत. सुभेदारी विश्रामगृह येथे औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि बीड या आठ तसेच नगर जिल्ह्यातील दोन आणि सोलापूर जिल्ह्यातील दोन अशा बारा लोकसभा मतदारसंघांचा ते आढावा घेतील. कोणत्या मतदारसंघात पक्षाची किती ताकद आहे, किती आमदार, जिल्हा परिषद सदस्य आहेत, लोकसभेसाठी पक्षाकडे कोणकोण इच्छुक उमेदवार आहे, याची माहिती ते घेणार आहेत. 

खैरे-जाधव वादाचा सोक्षमोक्ष 
खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यातील वाद पुन्हा चिघळला आहे. खैरे हे शिवसेना संपवतील, त्यामुळे त्यांनाच हटवा, अशी थेट मागणी जाधव यांनी केली आहे. या वादासह जिल्ह्यातील शिवसेनेच्या गटबाजीचा सोक्षमोक्ष पक्षप्रमुखांसमोर लागणार असल्याने गुरुवारच्या बैठकीकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 

असा आहे दौरा 
श्री. ठाकरे यांचे सकाळी आठ वाजता विशेष विमानाने आगमन होईल. तेथून ते पद्मपुऱ्यात आमदार संजय शिरसाट यांच्या नूतनीकरण झालेल्या कार्यालयाचे उद्‌घाटन करतील. त्यानंतर सुभेदारी विश्रामगृहावर प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत लोकसभा मतदारसंघनिहाय चर्चा करतील. शुक्रवारी (ता. 20) नगर व सोलापूर या दोन जिल्ह्यांतील प्रत्येकी दोन अशा चार लोकसभा मतदारसंघांतील बैठक संपल्यानंतर दुपारी विमानाने रवाना होतील. 

Web Title: aurangabad news Shivsena preparations for self-governance