एसटीच्या कर्मचाऱ्यांनी मागितले स्वेच्छा मरण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

औरंगाबाद - एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन द्यावे, या प्रमुख मागणीसाठी 110 एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाकडे स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली. रविवारी (ता. 25) झालेल्या कार्यशाळेत व्यवस्थापकांमार्फत या बाबतचे निवेदन राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. दरम्यान, एसटी महामंडळाच्या राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी "सोशल मीडियावर संघर्ष' नावाचा ग्रुप केला असून, या अंतर्गत राज्यात ठिकठिकाणी स्वेच्छा मरणाचा पवित्रा घेतला जाणार असल्याचेही कर्मचाऱ्यांनी सांगितले.

एसटीच्या कर्मचाऱ्यांना तुटपुंजा वेतनावर काम करावे लागत असल्याने कर्मचारी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांनी सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देण्याची मागणी केली आहे. यासाठी ऑक्‍टोबरमध्ये राज्यव्यापी संपही केला होता. दरम्यान, उच्च न्यायालयाने कृती कार्यक्रम आखून वेतन आयोगाचा प्रश्‍न सोडवण्याचे आदेश दिले; तरीही प्रत्यक्षात प्रश्‍न सुटत नसल्याने येथील मध्यवर्ती कार्यशाळेतील 110 कर्मचाऱ्यांनी राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.

तुटपुंजा वेतनामुळे एसटीच्या अनेक कर्मचाऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे; मात्र आत्महत्या करणे गुन्हा आहे. त्यामुळे स्वेच्छेने मरणाची परवानगी मागत असल्याचे त्यांनी म्हटले. शिवाय सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी व आर्थिक त्रासातून मुक्त करून जीवदान द्यावे किंवा स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावर 110 कर्मचाऱ्यांनी स्वाक्षऱ्या करून कार्यशाळा व्यवस्थापक श्री. काटे यांच्याकडे हे निवेदन दिले आहे.

एसटीच्या संघर्ष ग्रुपद्वारे राज्यभर सर्व कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा मरणाची परवानगी मागण्याचा निर्णय घेतला आहे. हा ग्रुप कुठल्याही संघटनेशी संबंधित नाही. शासनाने या प्रश्‍नात लक्ष न घातल्यास लोकशाही मार्गाने आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. येत्या काळात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- शरद टेकाळे.

देशातील अत्यंत कमी वेतन देणारे महामंडळ हे एसटी महामंडळ आहे. कर्मचाऱ्यांना आवश्‍यक वेतन मिळत नाही. त्यामुळे मूलभूत गरजाही पूर्ण होत नाहीत. कुटुंबाचे पालनपोषण करण्यात कर्मचारी कमी पडत आहेत. मुलांना चांगले शिक्षण देऊ शकत नाहीत. त्यामुळे तातडीने वेतन वाढ करण्याचा निर्णय घ्यावा.
- सचिन बर्वे

Web Title: aurangabad news st employee Voluntarily death