तीन हजारांचे खांब १७ हजारांना!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

औरंगाबाद - पथदिव्यांसाठी लावण्यात येणारे लोखंडी खांब तीन हजार रुपयांना उपलब्ध असताना तब्बल १७ हजार रुपये दराने खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (ता. २३) सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी उघडकीस आणला. याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.  

औरंगाबाद - पथदिव्यांसाठी लावण्यात येणारे लोखंडी खांब तीन हजार रुपयांना उपलब्ध असताना तब्बल १७ हजार रुपये दराने खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (ता. २३) सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी उघडकीस आणला. याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.  

महापालिकेच्या विद्युत विभागात अनागोंदी कारभार सुरू आहे. एलईडी पथदिवे बसविण्याचे १२० कोटींचे कंत्राट एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिसेस या कंपनीला दिलेले आहे. एकीकडे कंपनीचे काम सुरू असताना दुसरीकडे देखभाल दुरुस्ती करण्यासाठी जुन्या २२ ठेकेदारांना कायम ठेवले आहे. यावर नगरसेवक राजू वैद्य, भाजपचे राज वानखेडे, भगवान घडामोडे यांनी आक्षेप घेतला. तसेच राजू शिंदे यांनी महागडे खांब खरेदी केल्याचा प्रकार समोर आणला. सिडको एमआयडीसी भागात शंभर नवीन पथदिवे व खांब बसविण्याचे २० लाख रुपयांचे काम मंजूर केले होते. प्रत्येकी तीन हजार रुपये दराचे खांब खरेदी केले जाणार होते; परंतु ऐनवेळी तीनऐवजी १७ हजार रुपये दराचे महागडे खांब खरेदी केले. त्यामुळे शंभरऐवजी केवळ ३० खांबच आले, असे शिंदे यांचे म्हणणे होते. विद्युत विभागाचे उपअभियंता के. डी. देशमुख यांनी ही बाब कबूल केली. तर कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी यापुढे असे होणार नाही, असे स्पष्ट केले.

अधिकाऱ्यांना पाठीशी घालू नका 
विषय चिघळत असल्याने महापौर नंदकुमार घोडेले यांनी मध्यस्थी केली. कमी किमतीचेच खांब बसवा, असे आदेश त्यांनी दिले असता श्री. वैद्य यांनी ‘महापौर साहेब, अधिकाऱ्यांना पाठीशी घालू नका, कारवाई करा,’ अशी मागणी केली. त्यावर महापौरांनी आयुक्‍त विद्युत विभागाच्या बैठका घेणार आहेत, असे सभागृहात सांगितले.

Web Title: aurangabad news street lamp Pillars issue