‘मिलिंद’च्या वसतिगृहाची दुरुस्ती ६० दिवसांत होणार - सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

औरंगाबाद - मिलिंद महाविद्यालयाच्या वसतिगृह दुरुस्तीसाठी राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टतर्फे एक कोटी ५४ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी (ता. १४) वसतिगृहाची पाहणी केली. यानंतर अवघ्या ६० दिवसांत दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाईल, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

खासदार सुळे यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे, आमदार सतीश चव्हाण आदींनी ‘मिलिंद’च्या अजिंठा वसतिगृहाला भेट दिली. वसतिगृहातील तुटलेली कपाटे, दरवाजे, तुटलेल्या तुळया दुरुस्त करण्यात येणार असून पुरेशी प्रकाशव्यवस्था करण्यात येईल. हे काम अवघ्या ६० दिवसांत पूर्ण करावे, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केल्याची खासदार सुळे म्हणाल्या. तत्पूर्वी सार्थक असोसिएट्‌स यांनी वसतिगृहाची पाहणी करीत काम करण्याचे मान्य केले. या वेळी मिलिंद कला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान, पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर आदींची उपस्थिती होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या मिलिंद कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाचे वसतिगृह जीर्ण झाले आहे. डॉ. बाबासाहेबांनी सुरू केलेले कार्य अखंडपणे सुरू राहावे यासाठी राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. याविषयीचे पत्र शनिवारी (ता. १३) आमदार सतीश चव्हाण यांनी प्राचार्यांना दिले होते.

सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, राजेश टोपे, सतीश चव्हाण आदींनी नामविस्तार दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर नामांतर लढ्यातील शहिदांना वंदन केले. भिक्‍खूंच्या उपस्थितीत बुद्धवंदना करण्यात आली.

Web Title: aurangabad news supriya sule milind hostel