वेतनवाढच मिळणार नसेल, तर ‘आदर्श शिक्षक’ व्हायचे कशाला?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांना वेतनवाढ मिळणार नसल्याने या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्यासाठी शिक्षकांतून प्रतिसादच मिळत नाही. पैठण तालुक्‍यातून माध्यमिक विभागातून फक्‍त एक प्रस्ताव देण्यात आला आहे, तर सोयगाव तालुक्‍यातून एकही प्रस्ताव आलेला नाही. 

औरंगाबाद - आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांना वेतनवाढ मिळणार नसल्याने या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्यासाठी शिक्षकांतून प्रतिसादच मिळत नाही. पैठण तालुक्‍यातून माध्यमिक विभागातून फक्‍त एक प्रस्ताव देण्यात आला आहे, तर सोयगाव तालुक्‍यातून एकही प्रस्ताव आलेला नाही. 

शिक्षकांच्या कार्याचा गौरव करून त्यांना ज्ञानदानाच्या कार्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने दरवर्षी शिक्षकदिनी आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येते. मध्यंतरी आदर्श शिक्षकांना वेतनवाढ दिली जायची; मात्र गेल्या काही वर्षांपासून वेतनवाढीऐवजी केवळ शाल- श्रीफळ, फुलांच्या हारावर काम भागविण्यात येत आहे. यंदा तर शासनाने वेतनवाढ देणे योग्य नसल्याचा शासनादेशच काढला आहे. वेतनवाढ नाही तर नुसत्या शाल, श्रीफळ आणि मानचिन्हाने काय होणार अशी भावना शिक्षकांमध्ये वाढीस लागत आहे. यामुळे यंदाच्या शिक्षक दिनाच्या दिवशी आदर्श शिक्षक पुरस्कार घेण्याविषयी शिक्षकांनी उदासीनता दाखविली आहे. 

दरवर्षी प्राथमिक विभागातून ९, माध्यमिक विभागातून ९, तर विशेष शिक्षक गटातून एक असे १९ आदर्श पुरस्कार दिले जातात. शिक्षण विभागाकडून मंगळवारपर्यंत (ता. २९) आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रत्येक तालुक्‍यातून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. सोमवारपर्यंत (ता. २८) प्राथमिकसाठी औरंगाबाद, गंगापूर, वैजापूर तालुक्‍यातून प्रत्येकी दोन, कन्नड तालुक्‍यातून ३, खुलताबाद तालुक्‍यातून ५, तर फुलंब्री व सिल्लोड तालुक्‍यातून प्रत्येकी एक असे प्राथमिक शिक्षकांमधून १६ प्रस्ताव शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत. तर पैठण आणि सोयगाव तालुक्‍यातून अद्याप एकही प्रस्ताव आला नाही. माध्यमिक विभागातून गंगापूर तालुक्‍यातून ३, कन्नड व खुलताबाद तालुक्‍यातून प्रत्येकी २, तर वैजापूर, फुलंब्री व पैठण तालुक्‍यातून प्रत्येकी एक प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. विशेष शिक्षक वर्गातून पैठण तालुक्‍यातून एकमेव प्रस्ताव प्राप्त झाला असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले. 

पुरस्कार प्रदान सोहळा लांबणार
शिक्षक दिन पुढील महिन्यात मंगळवारी (ता. पाच) आहे. साधारणत: शिक्षक दिनी हे पुरस्कार प्रदान करण्याचा प्रघात आहे. मात्र यंदा पाच सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन असल्याने हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे. या महिन्याच्या अखेरीस शिक्षण विभागाकडे प्राप्त झालेले प्रस्ताव विभागीय आयुक्‍तांकडे पाठविण्यात येणार असून यानंतर कार्यक्रमाची तारीख निश्‍चित होईल असे सांगण्यात आले.

Web Title: aurangabad news teacher