पर्यटनस्थळांना जोडणार पहिला ‘मॉडेल रोड’

मंगळवार, 11 जुलै 2017

औरंगाबाद - शहराचा पहिला मॉडेल रोड हा मकाईगेट ते लेणी यादरम्यान तयार केला जाणार आहे. रस्त्यालगत मोकळी जागा (ॲव्हेन्यू) आणि पदपथ (पेडिस्टियल पाथवे) हे या रस्त्याचे वैशिष्ट्य राहणार आहे. त्यामुळे देश-परदेशांतून येणाऱ्या पर्यटकांपुढे शहराची प्रतिमा उजळण्यास काहीशी मदत होणार आहे.

औरंगाबाद - शहराचा पहिला मॉडेल रोड हा मकाईगेट ते लेणी यादरम्यान तयार केला जाणार आहे. रस्त्यालगत मोकळी जागा (ॲव्हेन्यू) आणि पदपथ (पेडिस्टियल पाथवे) हे या रस्त्याचे वैशिष्ट्य राहणार आहे. त्यामुळे देश-परदेशांतून येणाऱ्या पर्यटकांपुढे शहराची प्रतिमा उजळण्यास काहीशी मदत होणार आहे.

देश-विदेशातून शहरात येणारे पर्यटक बिबी-का-मकबऱ्याला आवर्जून भेट देतात. मकबऱ्यावरून औरंगाबाद लेणीला जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येतही आता वाढ होत आहे. मात्र, मकबरा गाठण्यासाठी दाट वस्तीतून वाट काढावी लागते. याशिवाय परिसरातील रहिवाशांचीही संख्या मोठी आहे. मकाईगेटपासून सुरू होणारा हा रस्ता औरंगाबाद लेणीपर्यंत जाणार आहे. राज्य सरकारने शहरातील रस्त्यांसाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून यातूनच या रस्त्याचे काम होणार आहे, अशी माहिती महापौर भगवान घडामोडे यांनी दिली.

दरम्यान, बावन्न दरवाजांचे शहर अशी ओळख असलेल्या औरंगाबादेतील सगळ्यात मोठ्या दरवाजांमध्ये मकाई गेटचा समावेश आहे. या दरवाजापासून तयार करण्यात येणाऱ्या या रस्त्याची रुंदी ही २४ मीटर राहणार आहे. 

‘ॲव्हेन्यू’ तयार करणार 
औरंगाबादेत व्हॉईट टॉपिंगचे रस्ते अनेक आहेत. पण यापैकी एकाही रस्त्यावर ॲव्हेन्यू तयार करण्यात आलेला नाही. या रस्त्यालगत साधारण साडेचार मीटर रुंदीची रिकामी जागा तयार करण्यात येणार आहे. या माध्यमातून लहानसहान वस्तूंची विक्री करणाऱ्यांना फायदा होणार आहे. हा औरंगाबादेतील पहिलाच ॲव्हेन्यू राहणार आहे. याच्या आणि शेजारील सायकल ट्रॅकच्या दरम्यान झाडांची लागवड करण्यात येणार आहे.

चालणाऱ्यांचाही विचार 
पायी चालणाऱ्यांसाठी या रस्त्याच्या डाव्या बाजूने पदपथ करण्यात येणार आहे. साधारण सव्वा मीटर रुंदीचा पदपथ (पेडिस्टियल पाथवे) तयार करण्यात येईल. यामुळे भररस्त्यातून चालणाऱ्यांची संख्या आपोआप कमी होईल. वाहनांच्या दळणवळणासाठीही यामुळे मोठी जागा उपलब्ध होणार आहे.

शहरातील पहिला मॉडेल रोड हा मकाईगेटपासून सुरू होऊन लेणीपर्यंत जाणार आहे. १०० कोटींमधून तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांपैकी हा एक राहणार आहे. यामुळे शहरात येणाऱ्या पर्यटकांची सोय होईल आणि नागरिकांनाही त्याचा फायदा होणार आहे. 
- भगवान घडामोडे, महापौर

असा असेल मॉडल रोड!
औरंगाबाद ः शहराच्या मोठ्या नागरी वसाहतीला आणि मुख्य ऐतिहासिक वास्तुंना जोडणाऱ्या वाटवर शहरातील पहिला मॉडल रोड तयार करण्यात येणार आहे. त्याचे मुळ डिझाईन तयार धीरज देशमुख यांनी तयार केले.

Web Title: aurangabad news tourist spot