अन्वी-रहिमाबाद शिवारातील जंगलात वृक्षतोड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

रहिमाबाद - अन्वी-रहिमाबाद (ता. सिल्लोड) शिवारात वन विभागाच्या जंगलातील वृक्षांची बेसुमार तोड सुरू असल्याने  घनदाट जंगल ओस पडू लागले आहे. एकीकडे संबंधित विभागाकडून शासनाच्या एक कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी वृक्षांची लागवड केली जाते. मात्र, दुसरीकडे असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन करण्याच्या कामाबाबत दुर्लक्ष केले जात आहे. वन विभागाच्या ताब्यात असणाऱ्या जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्यामुळे आता राहिलेली वनसंपदाही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

या ठिकाणी घनदाट झाडी असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात हरीण, मोर, लांडोर, कोल्हे, लांडगे व रानगवे यासह विविध वन्यजीवांनी आश्रय घेतला आहे. मात्र वारंवार होणाऱ्या वृक्षतोडीमुळे या भागात असणारे पर्यटनाचे सौंदर्य हरविले जात आहे. शासनाकडून मोठ्या थाटामाटात एक कोटी वृक्ष लागवडीचा गाजावाजा करून वृक्षांची लागवड केली जात आहे. त्यासाठी कोट्यवधीचा निधीही शासनाकडून खर्च होत असतो. लागवडीचा सोपस्कार विधी पूर्ण करून वृक्षलागवडीचे आकडे शासन दरबारी पोचवले जातात. पण लागवडीनंतर या वृक्षांच्या संगोपनासाठी मात्र प्रशासन हात झटकून मोकळे होताना दिसून येत आहे. तसेच रहिमाबाद शिवारात असणारी वनसंपदाही सामाजिक वनीकरण विभागाकडे संरक्षणासाठी ताब्यात आहे. मात्र दोन्ही वनसंपदा या सलग असल्यामुळे किमान अंदाजे पाचशे ते आठशे हेक्‍टर गायरान जमिनीवर वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागातर्फे मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली आहे. मात्र या भागात दोन्ही विभागांची गस्त नसल्याने या ठिकाणी असणाऱ्या शेकडो वृक्षांची कत्तल होताना दिसून येत आहे.

अन्वी-रहिमाबाद शिवारात असणाऱ्या वनसंपदेची मोठ्या प्रमाणात तोड होत असल्यामुळे या भागात नष्ट होत चाललेल्या निसर्गाचे संगोपन करणे गरजेचे आहे. मात्र संबंधित विभागाच्या दुर्लक्षाने या भागात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होताना दिसून येत आहे.
- दिलीप गवळी, वन्यप्रेमी

Web Title: aurangabad news tree cutting