भरती चौकशीसाठी झाडाझडती 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

औरंगाबाद - महापालिकेतील नोकर भरती घोटाळाप्रकरणी पुणे परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष तुकाराम मुंढे बुधवारी (ता. १२) दुपारी दोन तास ठाण मांडून चौकशी केली. लाड समिती अंतर्गत झालेल्या कर्मचारी भरतीच्या फायलींची तपासणी करत त्यांनी नोंदी घेतल्या असून, या चौकशीचा अहवाल ते शासनानेकडे सादर करणार आहेत. या चौकशीमुळे महापालिका अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

औरंगाबाद - महापालिकेतील नोकर भरती घोटाळाप्रकरणी पुणे परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष तुकाराम मुंढे बुधवारी (ता. १२) दुपारी दोन तास ठाण मांडून चौकशी केली. लाड समिती अंतर्गत झालेल्या कर्मचारी भरतीच्या फायलींची तपासणी करत त्यांनी नोंदी घेतल्या असून, या चौकशीचा अहवाल ते शासनानेकडे सादर करणार आहेत. या चौकशीमुळे महापालिका अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

महापालिकेत २०१० ते २०१४ दरम्यान, लाड समिती अंतर्गत झालेली कर्मचारी भरती वादात सापडली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासनाने तुकाराम मुंढे यांची विशेष चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. सुमारे अडीचशे तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या या भरती प्रकरणात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. विधिमंडळाच्या अधिवेशनातही तारांकित प्रश्‍न उपस्थित करण्यात आल्याने शासनाने श्री. मुंढे यांच्यासह तीन जणांची चौकशी समिती नियुक्ती केली. त्यानुसार दुपारी एक वाजता तुकाराम मुंढे महापालिकेत दाखल झाले. आयुक्तांच्या दालनात त्यांनी भरती प्रक्रियेशी संबंधित फायली चाळून नोंदी घेतल्या.  

अधिकाऱ्यांत खळबळ  
कडक शिस्तीचे अधिकारी, अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी देण्यात आल्यामुळे महापालिकेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. श्री.मुंढे महापालिकेत दाखल होताच सर्वजण ॲलर्ट झाले. ते आयुक्तांच्या दालनात आले तेव्हा अधिकाऱ्यांनी त्यांना आयुक्तांच्या खुर्चीवर बसण्याची विनंती केली. मात्र, ती माझी जागा नाही म्हणत त्यांनी स्वतंत्र खुर्ची मागवली. आयुक्तांच्या शेजारीच खुर्ची ठेवण्यात आली असता, मुंढे यांनीही खुर्ची टेबलाच्या एका कोपऱ्यात ठेवण्याची सूचना केली. याच ठिकाणी बसून व नंतर ॲन्टीचेंबरमध्ये बसून त्यांनी टिप्पणी घेतली. ही चौकशी गोपनीय असून, अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे, असे स्पष्ट करत त्यांनी बोलण्यास नकार दिला. 

कोणता मासा लागणार गळाला ! 
दरम्यान, दुपारनंतर मुंढे महापालिकेतून परत जाताच अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. कोणकोणत्या अधिकाऱ्याच्या काळात किती जणांची भरती झाली. कोणीकोणी गडबडी केल्या, यात किती जणांवर कारवाई होऊ शकते, याचा हिशेब हे कर्मचारी-अधिकारी मांडत होते.   

आयुक्तांच्या अनुपस्थितीत चौकशी 
महापौर भगवान घडामोडे, आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्यासह पाच जणांचे शिष्टमंडळ चीन दौऱ्यावर गेलेले आहे. मंगळवारी (ता. १८) हे शिष्टमंडळ शहरात परतणार आहे. महापौर, आयुक्तांच्या अनुपस्थितीत तुकाराम मुंढे चौकशीसाठी आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Web Title: aurangabad news tukaram mundhe recruitment scam in municipality