रिक्षा उलटून दोन ठार, नऊ गंभीर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

बनोटी - पाचोरा तालुक्‍यातील पिंपळगाव हरेश्वर-पाचोरा रस्त्यावर शनिवारी (ता. २४) सकाळी अकराच्या सुमारास मालवाहू रिक्षा उलटून झालेल्या भीषण अपघातात निंबायती न्हावी तांडा (ता. सोयगाव) येथील दोनजण ठार, तर नऊजण गंभीर जखमी झाले. त्यामुळे निंबायती न्हावी तांडा गावावर शोककळा पसरली आहे. 

बनोटी - पाचोरा तालुक्‍यातील पिंपळगाव हरेश्वर-पाचोरा रस्त्यावर शनिवारी (ता. २४) सकाळी अकराच्या सुमारास मालवाहू रिक्षा उलटून झालेल्या भीषण अपघातात निंबायती न्हावी तांडा (ता. सोयगाव) येथील दोनजण ठार, तर नऊजण गंभीर जखमी झाले. त्यामुळे निंबायती न्हावी तांडा गावावर शोककळा पसरली आहे. 

पिंप्री कोल्हे (ता. पाचोरा) येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेसाठी निंबायती न्हावी तांडा येथील क्रिकेटपटू मालवाहू रिक्षा (एमएच-१९, बीएम-२३३३) जात असताना कवली पाचोरा-पिंपळगाव रस्त्यावर कैलास क्षीरसागर यांच्या शेताजवळ रिक्षा उलटून रस्त्याच्या कडेला झाडावर आदळली. यात एकूण अकराजण दबले जाऊन दूरवर फेकले गेले. यात भरत राठोड (वय २४), राहुल जाधव (१८) या दोन तरुणांचा मृत्यू झाला. नऊजण गंभीर जखमी झाले असून, दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पिंपळगाव येथील रमेश गिते, नाना पाटील, रवींद्र गीते, मदन पाटील, शांतीलाल तेली आदींसह स्थानिक रहिवाशांनी तीन रुग्णवाहिका; तसेच मिळेल त्या वाहनाने पिंपळगाव हरेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तिथे आरोग्य अधिकारी उपस्थित नसल्याने गावातील सर्व खासगी डॉक्‍टरांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमींवर उपचार करून रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविले. जखमी अरविंद राठोड, रवींद्र पवार, विशाल चव्हाण, सजन राठोड, दिनेश राठोड, अजय राठोड, मिलीन राठोड, दिनेश पवार, रवींन राठोड (सर्व राहणार निंबायती न्हावी तांडा, ता. सोयगाव) हे १८ ते २५ वयोगटातील आहेत. पिंपळगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण राजपूत, हिरालाल परदेशी, किशोर राठोड यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. एकाच गावातील सर्व तरुण असल्याने या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. तालुक्‍यात एकाच आठवड्यात अपघाताच्या दोन घटना घडल्या असून, मंगळवारी (ता. १९) बनोटी जवळ जीप उलटून एकाचा मृत्यू होऊन बाराजण जखमी झाले होते. आज झालेल्या अपघातातही रिक्षा उलटून दोन जणांचा मृत्यू झाला. तालुक्‍यातील बस फेऱ्या बंद केल्यानेच मिळेल त्या वाहनात प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अशा घटना घडत असल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत.

सहा एप्रिलला होणार होते लग्न
मृत भरत राठोड घरातील कर्ती व्यक्ती होती. त्यांच्या घरची परिस्थिती नाजूक असून भाजीपाल्याचा व्यवसाय करून आपली रोजीरोटी चालवीत होते. भरतचा नुकताच साखरपुडा झाला होता. ता. सहा एप्रिल रोजी त्यांचे लग्न ठरले होते. दोघा कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Web Title: aurangabad news Two killed in auto rickshaw accident