गारठा सात अंशांपर्यंत खाली जाणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - थंडीची चाहूल लागली आहे. वाऱ्यातील गारवा आणि कोरडेपणा आता स्पष्टपणे जाणवत असल्याने हिवाळा खऱ्या अर्थाने आता सुरू झाला आहे. यंदाचा हिवाळी गहू उत्पादनासाठी चांगला असला तरी वादळ आणि गारपिटीचा तडाखा बसण्याचा अंदाज हवामानशास्त्राचे अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.

यंदा पाऊस चांगला झाल्याने हिवाळाही सुखकर होण्याची चिन्हे आहेत. यंदाचा पाऊस तुकड्या-तुकड्यात झाला असला, तरी थंडीसाठी तो फायद्याचा ठरणार आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ही चांगली बातमी असली तरी निसर्गाच्या लहरीपणाचीही शक्‍यता नाकारता येत नाही. गारठ्यासाठी जबाबदार असलेले आणि अफगाणिस्तान, पाकिस्तानाकडून येणारे ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ हे वारे आता उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहेत. हे यंदाच्या हिवाळ्यासाठी चांगले लक्षण असून थंडीचे प्रमाण चांगले राहण्याची शक्‍यता आहे, असे श्री. औंधकर यांनी सांगितले. 

ऑक्‍टोबर हीटचा मोसम संपल्यावरच थंडीचा तडाखा आता जाणवू लागला आहे. असे असले तरी आगामी काळात वर्षअखेरीस एखादे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार होण्याची चिन्हे आहेत. त्यादरम्यान गारपीट आणि अवकाळी पावसाची शक्‍यता नाकारता येत नाही. 

यंदा पावसाची नोंद चांगली झाल्याने थंडीही चांगली पडण्याची शक्‍यता आहे. सध्या किमान आणि कमाल तापमानाचा पारा तीन ते चार अंशांनी खाली आला आहे. याचा परिणाम कायम राहण्याची चिन्हे आहेत. यंदा पारा सात अंशांपर्यंत खाली येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. जानेवारी महिन्याच्या शेवटी हा तडाखा अनुभवायला मिळण्याची शक्‍यता आहे. 
- श्रीनिवास औंधकर, हवामानशास्त्राचे अभ्यासक

Web Title: aurangabad news winter temperature