लहान मुलांमध्ये कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम 

योगेश पायघन
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

जगात 28.5 कोटी दृष्टिदोष असलेल्या व्यक्ती 
3.9 कोटी व्यक्तींना पूर्ण अंधत्व 
24.6 कोटी व्यक्तींमध्ये मध्यम अथवा तीव्र दृष्टिदोष 
80 टक्के अंधत्व प्रतिबंधाने घालवणे शक्‍य 
जंतुसंसर्गामुळे अंधत्व येण्याचे प्रमाण मोठे 
दृष्टिदोषींपैकी 65 टक्के नागरिक पन्नाशीपुढचे 

औरंगाबाद - डिजिटल नवमाध्यमांच्या अतिवापराने लहान वयातही मुलांमध्ये कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोमचे प्रमाण आढळत आहे. सुशिक्षित, नोकरदारांमध्येही हे प्रमाण चिंताजनक आहे. प्रमाणाबाहेर वाढलेला गॅझेटचा वापर डोळ्यांसाठी घातक ठरतो आहे. त्यामुळे वेळीच दृष्टी शाबूत ठेवण्यासाठी "दृष्टिकोन' बदला, असे आवाहन जिल्हा नेत्रशल्य चिकित्सक डॉ. नीलांबरी कानडे यांनी केले आहे. 

अंधत्व, दृष्टिदोषाबाबत जनजागृतीसाठी ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या गुरुवारी जागतिक दृष्टिदिन जगभर पाळला जातो. "दृष्टीसाठी दृष्टिकोन बदला', हे यंदाचे घोषवाक्‍य आहे. त्या निमित्ताने जागतिक आरोग्य संघटनेने कृती आराखडा बनवलाय. त्याद्वारे कोणत्याही प्रकारच्या अंधत्वाकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन केले जातंय. दृष्टिबाधितांच्या राज्य विकास व वित्त प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक 5.47 लाख व्यक्ती अंध आहेत, तर सरकारी आकडेवारीनुसार, देशात सुमारे 80 लाख व्यक्ती दृष्टिबाधित आहेत. दृष्टिदोष असलेल्यांपैकी 65 टक्के लोक पन्नाशीपुढील आहेत. जंतुसंसर्गामुळे अंधत्वाचे प्रमाणही मोठे आहे. जनजागृतीमुळे गेल्या काही वर्षांत हे प्रमाण घटले असले तरी आजही ग्रामीण भागात भोंदूबाबांकडून उपचारांमुळे अनेक दृष्टी गमवतात. 

अंधत्वाची कारणे व सोयी सुविधा 
मोतीबिंदू, काचबिंदू, मधुमेह, उच्च रक्तदाब ही अंधत्वाची कारणे आहेत. मोतीबिंदू, काचबिंदू, अ जीवनसत्त्व, कुपोषण ही दृष्टिहीनतेची अन्य कारणे आहेत. केंद्र सरकारने राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमामध्ये दृष्टिहीनतेला यंदापासून जोडले आहे. त्याद्वारे डोळ्यांसंबंधी विविध आजार व शस्त्रक्रियांसह चष्मेवाटप, मुलांची नेत्र तपासणी इत्यादी उपक्रम सरकारी रुग्णालयात सुरू आहेत, असे नेत्रतज्ज्ञ डॉ. कैलास बाविस्कर यांनी सांगितले. 6 बाय 60 हे सुदृढ दृष्टी माणक आता 3 बाय 60 करण्यात आल्याने अंधत्वाची आकडेवारी कमी होईल, असेही ते म्हणाले. 

दिवाळीत कमी तीव्रतेच्या फटाक्‍यांचा आनंद घ्या. लहान मुलांना सांभाळा. डोळे सर्वांत नाजूक आणि मौल्यवान आहेत. वाहने हळू चालवा. अपघातात डोळ्यांना इजा होणार नाही, याची दक्षता घ्या. 
- डॉ. वर्षा नांदेडकर, नेत्ररोग विभागप्रमुख, घाटी, औरंगाबाद 

लवकर उपचार केल्यास अंधत्व, दृष्टी क्षीण होणे टाळता येते. मुलांच्या जन्मदाखल्यासोबतच त्यांची नेत्र तपासणीही करा. मुलांना गॅझेटपासून दूर ठेवा. त्याच्या अतिवापरामुळे दृष्टिदोषात वाढ होते आहे. 
- डॉ. नीलांबरी कानडे, जिल्हा नेत्रशल्य चिकित्सक, औरंगाबाद

Web Title: aurangabad news World vision day