मोहंमद तुघलकासोबत आलेली " ती ' बनली औरंगाबादकरांची लाडकी 

मधुकर कांबळे 
शनिवार, 7 डिसेंबर 2019

महंमद तुघलकाच्या काळात सैनिकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी नान रोटीची सुरवात झाली. गव्हाचे पीठ, अंडी, मीठ, खमीर मिसळून रात्रभर किंवा तीन ते चार तास ठेवले जायचे. मीठ मिरची, धने, कांदे, बिब्याची गोडंबी टाकली जायची. दौलताबाद परिसरात बिब्याची गोडंबी त्यावेळी मुबलक उपलब्ध व्हायची. यामुळे तिचा यात वापर केला जायचा. त्याला चांगली चव येण्यासाठी गोडंबी वापरली जाते. लाखो, हजारो सैनिकांसाठी जेवण तयार करणे सोप्पे काम नव्हते. यामुळे एकाच वेळी अनेक तंदूर (भट्टी) लावून त्यात नानरोटी तयार केल्या जायच्या. मोठ्या डेग (भांड्यात) खलिया तयार केल्या जायच्या त्यातून एकावेळी दोन अडीचशे लोक जेवतील एवढी खलिया (भाजी) तयार व्हायची.

औरंगाबाद-  दिल्लीचे सुलतान मोहमंद-बीन-तुघलक यांच्या सैन्याच्या काफिल्यासह ती दौलताबादपर्यंत आली आणि तिचा दख्खनमध्ये प्रवेश झाला. सुलतान तुघलक पुन्हा दिल्लीला परत गेले; मात्र ती स्थिरावली औरंगाबादमध्ये. नुसती स्थिरावली नाही तर औरंगाबादकर खवैय्यांच्या पसंतीला खरी उतरली आणि आज मुस्लिम कुटुंबांमध्ये कोणताही समारंभ असो तिला मोठी मागणी असते ती म्हणजे "नान रोटी'. तर्ऱ्ही मारलेल्या मटनाच्या रश्‍शासोबत ती आवडीने खाल्ली जाते म्हणून "नान-खलिया' अशी औरंगाबादकरांची लोकप्रिय डिश बनली आहे. 

औरंगाबाद शहराने नगरची निजामशाही, मोगलशाही आणि नंतर हैदराबादची निजामशाही अशा शाही सल्तनती पाहिल्या; मात्र त्याहीपूर्वी 14 व्या शतकात दिल्लीचे सुलतान मोहंमद-बीन-तुघलका यांनी दौलताबादला राजधानी बनवण्याचे स्वप्न पाहिले होते. दौलताबादला जर राजधानी केली तर उत्तरेकडे आणि दख्खनमध्ये (दक्षिण) नीटपणे लक्ष ठेवता येईल या उद्देशाने त्यांनी दिल्लीहून दौलताबादला राजधानी आणली; मात्र सैनिकांना, दरबाऱ्यांना इथले वातावरण मानवले नाही आणि सर्वांनी आग्रह केल्यानंतर त्यांनी पुन्हा आपली राजधानी दौलताबादहून दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेतला. यामुळे त्यांना इतिहासकारांनी लहरी महंमद, वेडा महंमद अशी विशेषणे लावली.

 हेही वाचा : ऐकावे ते नवलच, औरंगाबादेत चक्‍क भिंतच हरवली 

फक्‍त औरंगाबादमध्येच मिळते नान रोटी 

औरंगाबादच्या इतिहासाचे अभ्यासक डॉ. रफत कुरेशी म्हणाले, ""नान एक रोटीचा प्रकार आहे. गव्हाच्या पिठापासून तयार केलेली रोटी असते. स्पेशली खलियासोबत खाल्ली जाते. नानरोटी खाण्यात खरी मज्जा, स्वाद येतो तो बीफमध्येच. बीफ व मटण महाग झाल्याने लोक आजकाल चिकनचा खलिया तयार करतात. शहरात सर्वांत जुनी नानरोटी तयार करण्याचे ठिकाण सिटीचौकात आहे. पाणचक्की उभारणारे सुफी संत हजरत बाबा शाह मुसाफिर या ठिकाणी नानरोटी घेण्यासाठी यायचे. नानरोटीचे वैशिष्ट्‌ये असे की, तुघलकांसोबत नानरोटी आली असली तरी ती नावारुपाला आली, तिची ओळख निर्माण झाली ती औरंगाबादमध्येच. या शहराशिवाय देशाच्या अन्यत्र अशी स्वादिस्ट नानरोटी मिळत नाही. इथून अनेकांनी अन्य शहरात जाऊन नानरोटी तयार करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्या रोटीला औरंगाबादची सर आली नाही. ज्यांना नानरोटीची टेस्ट माहीत आहे आणि ते देशाच्या किंवा परदेशात राहतात ते औरंगाबादमध्ये येण्यापूर्वीच सांगून ठेवतात की नान खलियाचे जेवण पाहिजे, एवढी या रोटीची लोकप्रियता आहे.'' 

क्‍लिक करा : नांदेडात असाही विवाह, होणारा खर्च बालगृहाला 

तुघलकाच्या सैन्यासाठीचा खाद्यपदार्थ 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या निवृत्त इतिहास विभागप्रमुख डॉ. दुलारी कुरेशी म्हणाल्या, ""महंमद तुघलकाच्या काळात सैनिकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी नान रोटीची सुरवात झाली. गव्हाचे पीठ, अंडी, मीठ, खमीर मिसळून रात्रभर किंवा तीन ते चार तास ठेवले जायचे. मीठ मिरची, धने, कांदे, बिब्याची गोडंबी टाकली जायची. दौलताबाद परिसरात बिब्याची गोडंबी त्यावेळी मुबलक उपलब्ध व्हायची. यामुळे तिचा यात वापर केला जायचा. त्याला चांगली चव येण्यासाठी गोडंबी वापरली जाते. लाखो, हजारो सैनिकांसाठी जेवण तयार करणे सोप्पे काम नव्हते. यामुळे एकाच वेळी अनेक तंदूर (भट्टी) लावून त्यात नानरोटी तयार केल्या जायच्या. मोठ्या डेग (भांड्यात) खलिया तयार केल्या जायच्या त्यातून एकावेळी दोन अडीचशे लोक जेवतील एवढी खलिया (भाजी) तयार व्हायची. आता कोणत्याही मुस्लिम घरी समारंभ असेल तर नान खलिया आवर्जून केल्या जातात. आता तर नान खलियाचे क्‍लब झाले असून, दर रविवारी या क्‍लबमध्ये कोणाच्या तरी घरी दर्दी एकत्र येऊन नान खलिया तयार करतात.'' 

गव्हाच्या नानरोटीला मोठी मागणी 

शहाबाजारमधील अब्दुल हई रिसर्च सेंटरचे अब्दुल हादी म्हणाले, ""नानरोटीचा प्रवास दिल्लीपासून दौलताबादपर्यंत झाला. नान खराब होत नाही, बरेच दिवस चांगली राहते. गव्हाचे पीठ, रवा, मैदा यापासून नान बनवली जाते. त्यात दूध, मध मिसळतात तर खलियात खसखस, खोबरे, गोडंबी, धने, कांदे, मीठ, मिरची, मसाला असतो. पूर्वी सैन्य जेवायला बसायचे त्यावेळी एकाच वेळी दोन-दोन हजार सैनिक बसायचे. त्यावेळी मातीचे तंदूर लावत. आता कोणत्याही मुस्लिम परिवारामध्ये कोणताही समारंभ असो, नान खलिया अविभाज्य बनले आहेत. आज नान खलिया दख्खनमध्ये लोकप्रिय खाद्यपदार्थ बनला आहे. खास नान खलिया बनवणारे आचारी औरंगाबादेतून मागवले जातात. आजकाल नान रोटी गव्हाचे पीठ, मैदा, रवा यापासून बनवले जातात; मात्र सर्वांत जास्त मागणी असते ती गव्हाच्या नानरोटीला. 

वाचा : औरंगाबादमध्ये स्कूलबसची तपासणी गुलदस्त्यातच 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad Popular dish nan roti history