औरंगाबाद-पुणे आता दोन तासांत, भारतमालामधून तयार होणार एक्‍स्प्रेस वे 

रस्ता
रस्ता

औरंगाबाद - राज्याच्या नकाशावर वेगाने वाढणारी शहरे म्हणून ठसा उमटविणाऱ्या औरंगाबाद आणि पुणे या शहरांदरम्यानचा प्रवास भविष्यात अवघ्या दोन तासांत पूर्ण करता येऊ शकतो. ताशी 120 किलोमीटर वेगाने वाहने धावण्याच्या दृष्टीने या दोन शहरांना "एक्‍सेस कंट्रोल्ड हायस्पीड एक्‍स्प्रेस वे'ने जोडले जाणार आहे. 

विद्यमान चारपदरी रस्त्यावरील वाहनांची दरदिवशी संख्या औरंगाबादकडून 40 हजार असते तर हा आकडा वाघोली ओलांडताना एक लाखांच्या घरात जातो. या रस्त्याची गरज आणि वाढत्या वाहतुकीचा वेध घेत केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने औरंगाबाद आणि पुणे या दोन शहरांना "एक्‍सेस कंट्रोल्ड हायस्पीड एक्‍स्प्रेस वे' ने जोडण्याची योजना जाहीर केली आहे. या शहरांदरम्यान 220 किलोमीटर अंतराचा ग्रीनफिल्ड (जमिनीच्या नव्या अधिग्रहणासह नवे रेखांकन) महामार्ग तयार करण्याची घोषणा केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने केली आहे. 

नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोजेक्‍टच्या (एनएचडीपी) माध्यमातून देशातील विविध भागांत असे चार हजार किलोमीटर लांबीचे ग्रीनफिल्ड रस्ते तयार करण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्याचाच भाग म्हणून या रस्त्याची निवड केंद्र सरकारने केली आहे. वर्ष 2024-25 पर्यंत या कामाची सुरवात होण्याची शक्‍यता आहे. या रस्त्यावर वळणांची संख्या नगण्य असल्याने वाहनांचा वेग ताशी 120 किलोमीटरपर्यंत जाऊ शकणार आहे. त्यामुळे या दोन शहरांदरम्यानचा प्रवास अवघ्या दोन तासांत पूर्ण होणार आहे. पादचारी, सायकलधारी आणि दुचाकीस्वारांसाठी स्वतंत्र वाट असेल तर जड वाहनांसाठी एक्‍स्प्रेस वे मोकळा राहणार असल्याची माहिती एनएचएआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर "सकाळ'ला दिली. 
 
रेल्वे जोडणीचे काय? 
गेल्या अनेक दशकांत औरंगाबाद आणि पुणे या शहरांना जोडण्यासाठी रेल्वेचा विचार गांभीर्याने झालेला नाही. पुणे-नगर, नगर-शनी शिंगणापूर असेच सर्वेक्षण अतापर्यंत झाले. मात्र, औरंगाबाद-नगर-पुणे असे थेट सर्वेक्षण करून या नव्या एक्‍स्प्रेस वेलगत रेल्वेमार्गाचा विचार व्हायलाच हवा. या माध्यमातून जालना, औरंगाबाद, नगर, पुणे शहरांतील डझनभर औद्योगिक वसाहतींच्या दळणवळणासाठीचे अजून एक आणि स्वस्त साधन तयार होणार आहे. समृद्धीलगत हायस्पीड ट्रेनच्या धर्तीवर या एक्‍स्प्रेस वेचे रेखांकन करताना औरंगाबाद-पुणे रेल्वेमार्गाचा विचार व्हायला हवा, अशी मागणी नागरिक, उद्योजक करतात. 
 
औरंगाबादचा भार हलका व्हावा 
पश्‍चिम महाराष्ट्रातून विदर्भाकडे जाणाऱ्या वाहनांना औरंगाबाद शहरातून जावे लागते. यात जेएनपीटीतून निघणाऱ्या कंटेनर्सची संख्या मोठी आहे. या एक्‍स्प्रेस महामार्गाला औरंगाबाद शहराशी जोडावेच; पण त्याची एक जोडणी समृद्धी महामार्गाला दिली तर औरंगाबाद शहरात येणाऱ्या जड वाहनांचे प्रमाण घटणार आहे. दुसरीकडे विद्यमान चारपदरी रस्त्यालाही राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केलेले असले तरी त्या रस्त्याचे हस्तांतरण राज्याने अद्याप केंद्राकडे केलेले नाही. मात्र, हे हस्तांतरण आता थंडबस्त्यात जाण्याची चिन्हे आहेत. शिरूर-पुणे रस्त्याचे आधुनिकीकरण सुरूच राहणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com