औरंगाबादेतील दंगलीत पोलिस कार्यकर्त्यांसारखे वागले - धनंजय मुंडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

औरंगाबाद - दोन ते अडीच महिन्यांपूर्वी शहरात किरकोळ भांडणावरून दंगल होण्याची शक्‍यता गुप्तचर विभागाने व्यक्‍त केली होती. तसा प्रस्तावदेखील वरिष्ठांना सादर केला होता. कारवाई करण्याऐवजी ती माहिती दाबून ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी येथे केली. या दंगलीत पोलिस कार्यकर्त्यांसारखे वागताना दिसले. शिवाय सीसीटीव्ही फुटेजमध्ये खासदार, माजी आमदार, नगरसेवक दिसत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मंगळवारी (ता. १५) दुपारी श्री. मुंडे यांनी दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर सुभेदारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत आपली भूमिका मांडली. 

ते म्हणाले, ‘‘ही हिंदू-मुस्लिम दंगल वाटत नाही. त्याला नंतर तसा रंग देण्यात आला आहे. अडीच महिन्यांपूर्वी स्थानिक गुप्तचर विभागाने त्यांच्या वरिष्ठांना दिलेल्या अहवालात शहरातील संबंधित भागात किरकोळ भांडणे होण्याची शक्‍यता असून त्याचे रूपांतर दंगलीत होऊ शकते, अशी शक्‍यता व्यक्‍त केली होती. त्यावर कारवाई करण्याऐवजी ती माहितीच दाबून ठेवली. त्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करावे. महापालिकेतील सत्तापक्षातील एक नगरसेवक हप्ते मिळत नाहीत म्हणून लूट करतो. अतिक्रमण काढायला, नळजोडणी तोडायला लावतो, हे कुणाच्या सांगण्यावरून होते? बहुतांश जळालेली दुकाने ही हिंदूंची आहेत; मात्र त्यांचे भाडेकरू मुस्लिम होते.’’ 

मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत श्री. मुंडे पुढे म्हणाले, की राज्यात मोठी घटना घडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वत: यायला हवे होते; मात्र ते गृहराज्यमंत्र्यांना पुढे करीत आहेत. यावेळी आमदार सतीश चव्हाण, कमाल फारुकी, कदीर मौलाना, अभिजित देशमुख उपस्थित होते.

प्लॉटकडे जाण्यास रस्ता मिळावा म्हणून...
दंगलग्रस्त भागात माजी आमदार किशनचंद तनवाणी यांचा प्लॉट आहे. तेथे जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे या प्लॉटच्या आजूबाजूची काही दुकाने जाळली आहेत. स्वत:ची खळगी भरण्यासाठी या आमदाराने हे पाऊल उचलले असल्याचा आरोपही श्री. मुंडे यांनी यावेळी केला.

Web Title: Aurangabad riots like police workers